Weddings, voting on the same day
रमाकांत बन्सोड
गंगापूर : नगर पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. मात्र याच दिवशी मोठा शुभमुहूर्त विवाहसोहळ्यांची असल्याने लगबगही चरनसीमेवर आहे. परिणामी, मतदानाच्या टक्केवारीवर याचा काय परिणाम होणार, याबाबत शहरात आणि तालुक्यात चर्चा होत आहे.
विवाहासाठी गावाबाहेर जाणाऱ्या पाहुण्यांचा ओघ, लग्नाची धावपळ, व्यवस्था, व-हाडींची गर्दी आदींमुळे अनेकांना मतदानासाठी वेळ मिळेल का, याची शंका उमेदवारांसह प्रशासनालाही सतावू लागली आहे. स्थानिक विवाह मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालय हॉल व्यावसायिकांच्या माहितीनुसार २ डिसेंबर हा हंगामातील सर्वाधिक मागणी असलेला शुभ दिवस असल्याने बहुतेक ठिकाणी बुकिंग फुल्ल झाले आहे.
या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग आणि प्रशासनाने आधी मतदान, मगच लग्नफ्फ असा संदेश देत विशेष जनजागृती मोहीम वेगाने सुरू करण्याची गरज आहे. सकाळी लवकर मतदान करून नंतर विवाहसोहळ्यांचा आनंद लुटा, असे आवाहन अधिकारी नागरिकांना करत आहेत. मतदान हा लोकशाहीचा महाउत्सव असल्याने प्रथम मतदानाचे कर्तव्य बजावणे आणि त्यानंतरच समारंभात उपस्थित राहणे हे प्रत्येकाचे नागरी कर्तव्य असल्याचे प्रशासनाने स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. २ डिसेंबरला एकीकडे लग्नाची धामधूम तर दुसरीकडे मतदानाची हाक दोन्ही मुहूर्त जुळले असले तरी कोणाला प्राधान्य द्यायचे हे आता नागरिकांच्या जागरूकतेवर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, प्रत्येक मतदाराने आधी मतदान, मगच लग्न ही भूमिका दृढपणे घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.