सिल्लोड : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर पस्तीस जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि.२०) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ घडला. ट्रक वीज खांबाला धडकल्याने वीजवाहक तारा खाली पडून मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत होती. मात्र गस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
रेखाबाई वसंत गोसावी (रा. बोदवड, जि. जळगाव) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात ३०-३५ जण जखमी झाले. यात ८-९ जण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जळगावकडून लग्नाचे व-हाड घेऊन आयशर ट्रक (एमएच - १९, सीएक्स- ३२५४) श्रीरामपूरकडे जात होता. ट्रकमध्ये जवळपास ३५-४० जण होते. ट्रक धानोरा फाट्याजवळ येताच रस्त्याच्या खाली उतरली विजेच्या खांबाला धडकून उलटली.
यात विजेचे खांब वाकून वीजवाहक तार ट्रकच्या बाजूला पडली. तारांमध्ये वीजप्रवाह असल्याने मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होत होती. या अपघाताची माहिती मिळताच गस्तीवरील ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, बीट जमादार यतीन कुलकर्णी, संजय आगे, भिक्कन सतुके यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एकीकडे ट्रकजवळ वीजप्रवाह तारांची मोठ्या प्रमाणात होणारी स्पार्किंग, तर दुसरीकडे अंधार. अशात मदत करणे जिकरीचे होते. तरीही पोलिसांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने जीव धोक्यात घालून एक एक करून ट्रकमधील जखमींना बाहेर काढत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. यनंतर पोलिसांनी महावितरण कंपनीशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडित केला. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला
हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला. ट्रक विजेच्या खांबाला धडकून उलटला व वीजवाहक तारा तुटून खाली पडल्या. ट्रकपासून काही इंचाच्या अंतरावर पडलेल्या विजेच्या तारांमध्ये स्पार्किंग होत होती. तर ट्रकमधील वऱ्हाडी मंडळी मदतीची वाट पाहत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कुणीच नव्हते. मात्र एका नागरिकाने ही माहिती देताच पोलिस मदतीला धावले. पोलिसांनी जीवाची परवा न करता ट्रकमधील ३०-३५ जणांना सुखरूप बाहेर काढले. विजेची तार कदाचित ट्रकवर पडली असती किंवा स्पर्श केला असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन तास मदतकार्य
वन्हाडी मंडळी मदतीची वाट पाहत असताना गस्तवरील ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले. अंधार असल्याने मदत करणे तसे अवघड होते. मात्र पोलिसांनी मोबाईल बॅटरी व वाहनाच्या हेडलाईटच्या मदतीने जखमींना एक-एक करून बाहेर काढले. जवळपास दोन तास पोलिसांनी हे मदतकार्य करीत ट्रकमधील जखमींना बाहेर काढले व उपजिल्हा रुग्णालयात आणले.