We will transform the Zilla Parishad schools: MLA Sanjana Jadhav
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
सर्वसामान्य कुटुंबातील मुले ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असून त्यांना दर्जेदार शिक्षण आदी शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सर्व शाळांचा कायापालट करणार आसल्याचे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीन वसाहत केंद्र वासडी येथे आमदार आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या आमदार संजना जाधव यांनी शाळेला भेट दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा कक्षप्रमुख मुख्यमंत्री शासकीय योजना समन्वय व मदत कक्ष अनिल घुगे, कृउबा उपसभापती जयेश बोरसे, खरेदी-विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम, गटशिक्षण अधिकारी सबाहत नईमुद्दीन मोहम्मद, शिक्षण विस्तार अधिकारी मनीष दिवेकर, बाजीराव ताठे, नारायण बोडखे, विनोद जाधव, प्रशांत निर्मळ, आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा धाटबळे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या विकासाबाबत तसेच भौतिक सुविधांशी संबंधित अडचणींचे सविस्तर विवेचन केले.
त्यावर आमदार संजना जाधव यांनी शाळेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने सर्व अडचणी सोडवून लवकरच शाळांचा कायापालट करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यानंतर आमदारांनी शाळेच्या इमारती, वर्गखोल्या व परिसराची पाहणी करून भौतिक सुविधा सुधारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माता पालक, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती.