Water wastage from the lake at Ghanegaon continues...
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
अज्ञातांनी घाणेगाव येथील तलावाच्या सांडव्याला भगदाड पाडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत होती. वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी संबंधितांकडून उपाययोजना केल्यानतंर देखील सांडव्याच्या भगदाडामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
या वर्षी परतीच्या पावसामुळे घाणेगाव येथील लघुसिंचन तलाव शंभर टक्के भरला आहे. अज्ञातांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री या तलावाच्या सांडव्याला मधोमध भगदाड पाडले होते. यामुळे तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधिताला दिली होती. दरम्यान ११ नोव्हेंबर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.जी. शहाप-रे, उपअभियंता मनीष निरंजन आदींनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी शाखा अभियंता दीपक वाघमारे, विराज बोधने बीटप्रमुख रत्नाकर साखरे यांना वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गोण्यांमध्ये काळी माती भरून सदरील गोण्या व ताडपत्रीच्या साहाय्याने सांडव्याचे भगदाड बुजविले होते.
मात्र हे काम थातूरमातूर करण्यात आल्याने याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.