Water Tanker: Demand for water tankers has risen in Gunthewari areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाची तीव्रता वाढताच शहरालगतच्या गुंठेवारी भागातील विहिरी आणि विंधन विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची महापालिकेकडे धाव वाढली असून, पाणीपुरवठा विभागावर टँकरद्वारे पाणी देण्याची कसरत करण्याची वेळ आली आहे.
सातारा-देवळाई भागात गेल्या दोन दिवसांत किमान ३५ ते ४० सोसायट्यांनी एकत्र येत पाण्यासाठी ग्रुप तयार करून मनपाकडे नोंदणी केली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन मनपाने या भागात तातडीने पाच टँकर वाढविले आहे. मात्र अवघ्या दोनच दिवसांत या भागातून महापालिकेच्या टँकरसाठी झोन-८ कार्यालयाकडे ११५ टँकरची नोंदणी झाली आहे.
सातारा-देवळाईसह शहरातील अन्य नो नेटवर्क भागात दुष्काळामुळे पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. विहिरी आणि विंधनविहिरी तळाला गेल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी टँकरही दोन-तीन दिवसांनी मिळत आहे. यापूर्वी नागरिक जारचे पाणी विकत घेऊन गरज भागवत होते. मात्र पाणीटंचाईमुळे पूर्वी १० ते २० रुपयांना मिळणाऱ्या जारच्या किमतीतही आता दहा ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.
त्याचबरोबर खासगी टँकरवरही नागरिकांचा आधार होता. दोन हजार लिटर क्षमतेचा टँकर पूर्वी ५०० ते ७०० रुपयांत मिळत होता. मात्र, पाण्याची मागणी वाढल्याने खासगी टँकरचे दरही वाढले आहेत. पैसे देऊनही वेळेवर टँकर मिळत नसल्याने गुंठेवारी भागातील नागरिकांची अडचण वाढली आहे. सातारा-देवळाई भागात यापूर्वी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. प्रत्येक टँकर किमान दहा फेऱ्या करीत होता.
मात्र, मागणी वाढल्यानंतर मनपाने पाच हजार लिटर क्षमतेचे तीन आणि २६ हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर अतिरिक्त उपलब्ध करून दिले आहेत. मोठ्या क्षमतेचे दोन टँकर सातारा-देवळाई परिसरातील विहिरींमध्ये पाणी आणून टाकत आहेत. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या जुन्या पद्धतीनुसार नागरिकांना नळाद्वारे पाणी वितरित केले जात आहे.
ग्रुप करून मनपाकडे नोंदणी
सातारा-देवळाई परिसरातील सोसायट्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पाण्यासाठी ग्रुप तयार केले आहेत. ग्रुपची मनपाकडे नोंदणी केल्यानंतर संबंधितांकडून पैसे भरले जातात. यासाठी महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २०० लिटरच्या एका ड्रमसाठी ३६६ रुपये शुल्क निश्चित केले आहे. या शुल्कात महिनाभरात एक दिवसाआड अशा पद्धतीने १५ दिवस ड्रमभर पाणी दिले जाणार आहे. मागणी वाढल्याने या व्यवस्थेवरही पाणीपुरवठा विभागाचा ताण वाढला आहे.
पाणी द्या ची वाढली मागणी
सातारा-देवळाईपुरतीच ही परिस्थिती मर्यादित नसून पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, गणेशनगर, मकबरा परिसर, हिलाल कॉलनी, जटवाडा रोड, हसूल, जाधववाडी, नारेगाव, चिकलठाणा यांसह अनेक गुंठेवारी भागांतून टँकरची मागणी वाढली आहे. दुष्काळामुळे स्थानिक पाणीस्रोत आटल्याने नागरिकांकडून पाणी द्या ची मागणी सातत्याने केली जात आहे.
टँकरची संख्या, फेऱ्या वाढविण्याचे आव्हान
मागणीचा वाढता दबाव लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन्ही कंत्राटदारांना टँकरची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरालगतच्या गुंठेवारी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकरची संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचे आव्हान महापालिकेसमोर उभे राहिले आहे.