Water supply to the old city will be provided daily from January 1st.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन जल योजनेतून शहरवासीयांना डिसेंबरअखेर २०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. या वाढीव पाण्याचे महापालिका आतापासूनच पाणीपुरवठा विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली असून, वाढीव पाण्यामुळे शहरातील जुन्या वसाहतींना दररोज पाणीपुरवठा करता येईल, असा विश्वास महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या अस्तित्वात २७ जलकुंभच असून, त्यावर सुमारे लाख नागरिकांना पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात आहे.
शहरासाठी टाकण्यात येत असलेल्या २५०० मिमी व्यासाच्या नवीन जल योजनेचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या योजनेतून शहरात सुमारे ५२ जलकुंभ, १९०० किलोमीटर अंतराअंतर्गत जलवाहिन्या आणि पाणी वितरण वाहिन्या टाकण्याचेही काम केले जात आहे. त्यासोबतच मुख्य आहे,
मुख्य २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान १० ठिकाणी एकमेकांशी जोडणे शिल्लक आहे. हे काम येत्या दोन आठवड्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यासोबतच जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलचे कामही आता नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यासोबतच शेवटच्या स्लॅबवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मोटर बसविण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
शहरात डिसेंबरअखेर २०० एमएलडी पाणी दाखल होणार आहे. हे पाणी शहराच्या विविध वसाहतींना दररोज कसे देता येईल, याचे नियोजन सध्या महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी महापालिकेकडे मुबलक जलकुंभही उपलब्ध नाहीत. तरीही प्रशासन उपलब्ध अंतर्गत जलकुंभआणि अंतर्गत जलवाहिन्यांतूनच पुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.
अर्धवट कामे...
शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना रोडवर ९०० आणि ७०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. हे काम मागील ३ महिन्यांपासून सुरू आहे. दूध डेअरी चौकापासून सुरू झालेले हे काम आकाशवाणी चौकापुढे येऊन थांबले आहे. दिवाळीपासून काम पुढे झालेले नाही. अशीच परिस्थिती शहराच्या विविध भागांतील अंतर्गत जलवाहिन्यांची आहे. त्यामुळेच जुन्या शहरांनाच दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने तूर्तास करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा-देवळाईला नळाचे पाणी
सातारा-देवळाई परिसरातील बहुतांश वसाहतींमध्ये अंतर्गत पाणी वितरणाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नव्या जल योजनेच्या मुख्य जलवाहिनीतून यशस्वीरीत्या पाणीपुरवठा सुरू झाला तर सातारा-देवळाईतील बहुतांश वसाहतींना नववर्षात नळाचे पाणी उपलब्ध होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.