Water supply for the citizens of Satara to begin soon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या म्हाडा कॉलनीतील जलकुंभातून पाण्याची चाचणी घेण्यात आली असून वितरण वाहिन्यातून पाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात पोहोचले पाणी असून यासाठी भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता.
सातारा परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून जारच्या पाण्याने तहान भागवावी जागत आहे. परंतु, नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे आता लवकरच या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांच्यासह भाजपचे स्थानिक नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. म्हाडा कॉलनीतील टाकीतून पाणी सोडून वितरण व्यवस्थेची चाचणी घेण्यात आली.
या माध्यमातून संबंधित जलवाहिन्यांमधून पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या चाचणीनंतर चौकाचौकांतील पाइपलाइन जोडणी, अपूर्ण जोडण्या आणि जलवाहिन्यांमधील गॅप भरण्याची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. उर्वरित चाचण्या आणि आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. यावेळी नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे, पदमसिंग राजपूत, नगरसेविका सविता कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते राजीव थिटे पाटील, भाजप मंडळाध्यक्ष ऋषिकेश भालेराव यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याची चाचणी यशस्वी
म्हाडा कॉलनीतील जलकुंभातून पाणी सोडले.-
राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत पाणी पोहोचले.
अपूर्ण पाइपलाइन जोडण्या व इतर कामे पूर्ण होणार.
- उर्वरित चाचण्यांनंतर प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणार.