Water storage in projects in the district is three times higher than last year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दमदार पावसामुळे यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरीही उन्हाळ्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांत पाण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने १२२ गावांसाठी ३० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील पाटबंधारे, जलाशयातील आकस्मिक आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजेची निश्चिती करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जीवन प्राधिकरणाचे अभियंता विजय कोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच जिल्हा परिषदव महापालिकेने इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यंदा जिल्ह्यामध्ये मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे. भविष्यातील पाण्याची गरज पाहता काही तालुक्यांसाठी पाणी आरक्षित करण्याचे नियोजन जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जलसंपदाच्यावतीने माहिती देण्यात आली आहे. यंदा जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पातील पाणीसाठा एकूण ९४ टक्के आहे. गतवर्षी हा पाणीसाठा केवळ २८ टक्के होता. भविष्यात गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांतील उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता भासू शकते. या अनुषंगाने जलसंधारण आणि पाणीपुरवठा विभागाने १२२ गावांसाठी ३० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केलेले आहे.
हे पाणी नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून आरक्षित करण्यात आले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरकरिता एकूण ३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्याचे नियोजन केलेले आहे.
जिल्ह्यात लहान आणि मोठ्या प्रकल्पांचे मिळून एकत्रित पाणीसाठा हा जिल्ह्याच्या गरजेनुसार आरक्षित केला जातो. यामध्ये पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन इतर पाणी हे सिंचनासाठी वापरले जाते.