Water resources tender worth Rs 453 crore under suspicion
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जलसंपदा विभागाच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील जवळपास ४६१ कोटी रुपयांच्या पाईपलाईन कामांच्या दोन निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यातील १८१ कोटींच्या निविदेत ज्या ठेकेदार कंपनीला वार्षिक उलाढाल आणि अनुभव अटी-शर्तीनुसार नसल्याचे कारण देत अपात्र ठरविण्यात आले. त्याच कंपनीला अवघ्या सहा महिन्यांतच तब्बल २७३ कोटींच्या तशाच प्रकारच्या कामासाठी पात्र ठरविण्यात आले. अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीची पत आणि अनुभव इतका वाढलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करीत या दोन्ही निविदांची दक्षता पथकाकडून चौकशी करण्याची मागणी नितीन खोडेगावकर यांनी गोदावरी महामंडळाच्या कार्यकरी संचालकांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
त्यांनी तक्रारी म्हटले आहे की, कृष्णेचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी मकृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पफ हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेची अनेक कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. या योजनेच्या टप्पा ४ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गोरमाळा माथा ते सोनगिरी स्टोरेज टैंकपर्यंत भूमिगत जलवाहिनीद्वारे (बंदिस्त प्रवाही नलिका) पाणी आणण्याच्या कामाची जलसंपदाच्या धाराशिव उसपा सिंचन विभागाने सन २०२३ मध्ये १८१ कोटी ४० लाख रुपयांची निविदा जारी केली. अनेक ठेकेदारांप्रमाणे पुण्यातील जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन कंपनीनेही या कामासाठी निविदा भरली. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी या निविदा उघडण्यात आल्या. त्यात जळगावच्या महावीर व्हीपीए या कंपनीला पात्र ठरवून हे काम मिळाले. तर जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन कंपनीला वार्षिक उलाढाल आणि अशा कामाचा सामान्य अनुभव हा अटी-शर्तीनुसार नाही, असे कारण दाखवून अपात्र ठरविण्यात आले.
त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनीच पुन्हा याच योजनेच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मीरगव्हाण येथील भूमिगत मुख्य जलवाहिनीद्वारे (बंदिस्त प्रवाही नलिका) पाणी आणण्याच्या कामासाठी कृष्णा- मराठवाडा बांधकाम विभाग १ मार्फत एप्रिल २०२४ मध्ये २७३ कोटी २८ लाखांची निविदा प्रकाशित करण्यात आली. यातही अनेक ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यात जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन कंपनीही होती. सर्वात कमी दराने निविदा भरल्यामुळे जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम मिळाले.
ज्या जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन कंपनीला सहा महिन्यांपूर्वीच आर्थिक उलाढाल आणि अनुभव नसल्याचे कारण दाखवून १८१ कोटींच्या कामासाठी अपात्र ठरविण्यात आले, त्याच कंपनीला नंतर २७३ कोटींच्या कामासाठी मग पात्र कसे ठरविले? अशा प्रश्नामुळे या दोन्ही तब्बल ४५३ कोटी रुपयांच्याच निविदाच संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
सहा महिन्यांतच आर्थिक पत, अनुभव वाढला कसा?
जलसंपदा विभागाच्याच कागदपत्रानुसार जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन कंपनीची ऑक्टोबर २०२३ मध्ये १८१ कोटी रुपयांचे काम मिळविण्याइतकी वार्षिक उलाढाल नव्हती, शिवाय तितका सामान्य अनुभवही त्या कंपनीकडे नव्हता, असे कागदपत्रच दर्शवितात. मग सहाच महिन्यांत कंपनीची उलाढाल आणि अनुभव कसा वाढला ?. एक तर जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सरळ सरळ जी. एस. कुंभार कन्स्ट्रक्शन या कंपनीला १८१ कोटींच्या कामात यावेळी तुम्ही थांबा, हे काम दुसऱ्या कंपनीला द्यायचे आहे, असे सांगून हेतुपुरस्सर आर्थिक उलाढाल व अनुभवाची त्रुटी ठेवायला लावली किंवा चुकीच्या कागदपत्राअधारे त्या कंपनीला नंतर २७३ कोटींचे काम देण्यात आले, असा आरोप करीत या दोन्ही कामांच्या निविदांची चौकशी करण्याची तक्रार करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी या दोन्ही कामांच्या अटी-शर्ती सारख्याच ● होत्या. दोन्ही कामेही साख्याच पद्धतीची आहेत. मग असे असताना जी. एस. कुंभार या कंपनीला भूम येथील कामातून बाद करण्यात आले आणि त्याच कंपनीला करमाळा तालुक्यातील मीरगव्हाण योजनेच्या कामात पात्र ठरविण्यात आले, हा प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकाराची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच या दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेश रद्द करून फेरनिविदा करण्यात यावी. अन्यथा या प्रकरणी न्यायालयात आम्ही दाद मागू.- नितीन पाटील खोडेगावकर (सामाजिक कार्यकर्ते)