Jayakwadi Dam : जायकवाडीत भरभरून पाणी, तालुक्यात पावसाची प्रतीक्षा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Jayakwadi Dam : जायकवाडीत भरभरून पाणी, तालुक्यात पावसाची प्रतीक्षा

गंगापूर : नाशकातील पावसामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली

पुढारी वृत्तसेवा

रमाकांत बन्सोड

गंगापूर : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जायकवाडी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, धरण ६४ टक्के भरले आहे. गोदावरीला पूर आल्यामुळे गंगापूर तालुक्यातील नदीकाठच्या सुमारे २० गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील गंगापूर तालुक्यात पावसाने मारलेली दडी चिंताजनक आहे. पावसाळा सुरू झाला की, जून महिन्यात जिल्हाभर सर्वदूर पावसाचे आगमन होते. यंदा मे महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात पेरणीजोगा पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. परंतु हा पाऊसही सर्वत्रच कमी अधिक प्रमाणात झाला. त्यामुळे काही ठिकाणी पेरणी झाली. काही ठिकाणी उशिरा झाली. आजमितीस ७५ टक्के पेरणी झाली असून, अद्याप २५ टक्के पेरणी बाकी असल्याचे कृषी अधिकारी बापूराव आहेर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, गंगापूर, दारणा, भाम, भावली, वाकी निळवंडे, भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अतिवृष्टी तर इगतपुरी, पेठ, सुरगणा, दिंडोरी, बागलान या तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असल्याने भाम, भावली, गंगापूर धरण, दारणा, भोजपूर, वालदेवी, मुकणे, करंजवण, कडवा धरणातून पाणी नांदूर मधमेश्वर धरणात जमा होत आहे. या सर्व धरणांतून येणारे पाणी गोदावरी नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

दि.९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दारणा-३५३० क्युसेक, गंगापूर २२०५ क्युसेक, होळकर ब्रीज ३३४८ क्युसेक, नांदुर मधमेश्वर २२३४५ क्युसेक, पालखेड १३५६ क्युसेक, भोजपूर ५३९ क्युसेक, भावली ४८१ क्युसेक, भाम १२४५ क्युसेक, वाकी (बंद) क्युसेक, वालदेवी ५९९ क्युसेक, आळंदी २४३ क्युसेक, कश्यपी १००० क्युसेक, मुकणे (बंद) क्युसेक, कडवा ८०४ क्युसेकने, कारंजवन ९४५ क्युसेस, पुणे गाव ५५० क्युसेस पाणी गोदावरी पात्रात सोडले जात आहे.

गोदावरी ३५६००० क्युसेस, व प्रवरा नदी पात्रातून १५३०६ क्युसेस पाणी असे दोन्ही मिळून ५०९०६ क्युसेस कायगाव टोका येथे पाणी जायकवाडी जलाशयात पोहोचत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

वीस गावांना सतर्कतेचा इशारा

पुराच्या वाढत्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन गंगापूर तहसील प्रशानाने तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, अगर कानडगाव, बगडी, ममदापूर, जामगाव, कायगाव, अमळनेर, टोंगवस्ती, धानोरा, धनगरपट्टी, महालक्ष्मीखेडा, सावखेडा यासह गोदावरीच्या काठावरील वीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT