Water crisis in Gangapur Taluka; groundwater levels hit rock bottom
रमाकांत बन्सोड
गंगापूर : पावसाळा संपत आला तरी गंगापूर तालुक्यात पावसाचा दीर्घ खंड कायम असल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. सलग दोन ते अडीच महिन्यांपासून दमदार पाऊस न झाल्याने खरीप पिके हातातून जाण्याची वेळ आली असून, दुसरीकडे भूजलपातळी झपाट्याने खालावत आहे. तालुक्यातील तब्बल २६ गावे सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून असून, सुरू असलेल्या टँकरची मुदत महिनाअखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र, १ ऑक्टोबरपासून नव्याने टँकर प्रस्ताव सादर करून मंजुरीची प्रक्रिया करावी लागणार असल्याने पाणीटंचाई कायम राहिल्यास प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या काही सरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओलावा संपला आहे. सोयाबीन सध्या शेंगा भरण्याच्या निर्णायक अवस्थेत असताना पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत सोयाबीन वाळण्यास सुरुवात झाली आहे. मूग पिकालाही मोठा फटका बसला असून बियाणे, खते, मशागत आणि मजुरीचा खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कपाशीवर पातेगळ; बागायती पिकांनाही फटका
कपाशी पिकाची अवस्थाही बिकट झाली आहे. पाण्याचा ताण पडल्याने कपाशीची पाने लालसर पडली असून झाडांची वाढ थांबली आहे. मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मोसंबी आणि डाळिंब बागांनाही पावसाच्या खंडाचा फटका बसला असून ओलावा कमी झाल्याने फळांचा आकार आणि प्रतवारी घसरण्याची चिंता उत्पादकांना लागली आहे.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठ्यासाठी पाच, तर टँकर भरण्यासाठी २० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. मात्र, पावसाचा अभाव आणि सातत्याने होणाऱ्या उपशामुळे या विहिरींचीही पाणीपातळी कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात टँकर भरण्यासाठीही पुरेसे पाणीस्रोत उपलब्ध राहतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिण्याच्या पाण्यासोबत पशुधनाचेही संकट
पाणीटंचाईचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यावर झालेला नाही. खरीप पिके करपण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देणेही कठीण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधन अशा तिन्ही आघाड्यांवर संकट निर्माण झाले आहे.
नाथसागरामुळे गोदावरी पट्टयाला तूर्त दिलासा
दरम्यान, नाथसागर जलाशयात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याने गोदावरी पट्टा तसेच गंगापूर शहराला तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्याच्या इतर ग्रामीण भागात पाणीस्थिती चिंताजनक आहे.
शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजना रखडल्या
तालुक्यातील अनेक गावांच्या शाश्वत पाणीपुरवठा योजना विविध कारणांमुळे रखडल्याने टँकरवरील अवलंबित्व कायम आहे. दरवर्षी टंचाईच्या काळात तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उभी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
विहिरी, तलाव तळाला
पावसाअभावी ग्रामीण भागातील विहिरी, गावतलाव आणि अन्य जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने खाली जात आहे. अनेक ठिकाणी उपलब्ध जलस्रोत तळ गाठत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. भर पावसाळ्यातच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
जलसंधारणाला गती देण्याची गरज
सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविणे, पर्यायी पाणीस्रोत शोधणे आणि टँकर व्यवस्थेचे नियोजन करण्याबरोबरच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज आहे. बंधारे, पाझर तलाव, जलपुनर्भरणाच्या उपाययोजना आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे शास्त्रीय नियोजन यावर भर देणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाचा खंड आणखी वाढल्यास तालुक्यातील ग्रामीण जनतेसमोर पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधनाचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात टँकर; उन्हाळ्याची चिंता
पावसाळ्यातच २६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असल्याने आगामी उन्हाळ्याबाबत आतापासूनच चिंता व्यक्त होत आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास भूजलसाठ्यांवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती आहे