छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील 'सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' (गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेड) या कंपनीच्या कॅन्टीनचा अन्न परवाना एफडीएकडून तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षेची पायमल्लीमुळे कामगारांच्या आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. आ. प्रशांत बंब यांनी चौकशी करण्याचे पत्र दिल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत अन्न प्रशासनाकडून खाद्यअन्नामधील भेसळ रोखण्यासाठी धडक कारवाई सुरू आहे. यात अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी वाळूज एमआयडीसी परिसरातील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कॅन्टीनची अचानक तपासणी केली.
या तपासणी अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. अस्वच्छ व घाणीतच अन्न शिजवणे, भाजी कापली जात होती. जेवणाचे टेबल अत्यंत अस्वच्छ होते. फरशा तुटलेल्या, सांडपाण्याचे नाले अत्यंत घाण होते. फ्रिज गंजलेला आणि तुटलेल्या फ्रिजमध्ये कच्चे-शिजवलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी अन्न एकत्र ठेवल्याचे आढळले. तसेच परिसरात कोळ्याची जाळी आढळली असून कीड नियंत्रणाच्या नोंदी नव्हत्या.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय व लसीकरण प्रमाणपत्रे नियमानुसार नव्हती, तसेच स्वयंपाकाच्या तेलाची गुणवत्ताही तपासली जात नव्हती. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाल्याने सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी द. वि. पाटील यांनी कॅन्टीनचा अन्न परवाना रद्द केला.
कायदेशीर कारवाई व पुढील निर्देश
कर्मचाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण होत असल्याने आदेशात नमूद केलेल्या सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करून त्याचा अहवाल पुराव्यांसह सादर करावा लागेल. त्यानंतर फेरतपासणी करूनच परवाना पूर्ववत करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले आहे.