वाळूज महानगर :बजाजनगरात एकावर तलवारीने वार करून नंग्या तलवारी नाचवत परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांच्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) रात्री तिसगाव येथील खवड्या डोंगर परिसरात मुसक्या आवळल्या.
ऋषिकेश ऊर्फ मारी शालिक सोनवणे (१९) प्रकाश रमेश गायकवाड (२५) व अभिजित किशोर फाटे अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बजाजनगर येथील स्व. मीनाताई ठाकरे मार्केट लगत सुरू असलेल्या बग्गी जुगार अड्याजवळ गुरुवारी ऋऋषिकेश सोनवणे, प्रकाश गायकवाड, अभिजित फाटे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मधुकर रामा भालेराव (३५ रा. एसटी कॉलनी, अयोध्यानगर, बजाजनगर) यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर तलवारीने वार केला होता. मधुकर याने जखमी अवस्थेत घटनस्थळावरून पळ काढत आपला जीव वाचविला होता.
यावेळी दहशत पसरविण्याचा उद्देशाने तिघांनी लगतच्या वाईनशॉपकडे आपला मोर्चा वळवून तेथे उभ्या असलेल्या तीन दुचाकींचे नुकसान केले होते. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. मात्र वडगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांच्या जवळील दोन तलवारी, लाकडी दांडा फेकून देत तेथे दुचाकी सोडून त्यांनी तिसगाव येथील खवड्या डोंगरावर मुक्काम केला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा मधुकर प्रकाश गायकवाड याच्या घरासमोर जाऊन त्यास धमकी दिली. त्यानतंर मनमाड येथे दिवसभर थांबून सायंकाळी ते वापस खवड्या डोंगर परिसरात आले. याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी दिसून येताच पथक त्यांना पकडण्यासाठी धावले असता पोलिसांना पाहून आरोपींनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
कामगिरी करणारे पोलिसांचे पथक
ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील, प्रवीण पाथरकर, जमादार अरुण उगले, अविनाश ढगे, राजाराम वाघ, सुरेश भिसे, पोलिस अंमलदार नितीन इनामे, समाधान पाटील, हनुमान ठोके, वैभव गायकवाड, संदीप तागड, रोहित चिंधाळे, शिवनारायण नागरे यांनी केली.