फर्दापूर : जून महिना सुरू झाला असला तरी उष्णतेचा तडाखा कायम असून फर्दापूर परिसरात तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील वाघूर नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने वन्यप्राण्यांसमोर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. नदीपात्रातील दगड-गोटे आणि कोरडी जमीन पाहता उन्हाळ्याची तीवता स्पष्टपणे जाणवत आहे.
रविवारी (दि.7) दुपारी वाघूर नदीपात्रात पाण्याच्या शोधात भटकणारी नीलगाय दिसून आली. अधूनमधून मान खाली घालून पाण्याचा मागमूस शोधण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. मात्र कोरड्या नदीपात्रात तिला निराशाच पदरी पडत असल्याचे चित्र होते.
फर्दापूर व अजिंठा परिसरातील राखीव जंगलात बिबट्या, अस्वल, नीलगाय, रानडुक्कर, हरीण, कोल्हे, तरस तसेच विविध पक्ष्यांचा वावर आहे. मात्र यंदा तीव उष्णता आणि पाण्याअभावी या वन्यजीवांचे हाल होत आहेत. एप्रिलपासूनच नदीतील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली होती. मे महिन्याच्या अखेरीस वाघूर नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले.
स्थानिक ग््राामस्थांच्या मते, पूर्वी उन्हाळ्यातही नदीपात्रातील काही डोहांमध्ये पाणी टिकून राहत होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा शेतशिवार आणि मानवी वस्त्यांकडे ओढा वाढत असून मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, उन्हाळ्याच्या अखेरीस आणि पावसाळ्याच्या प्रारंभीचा काळ वन्यजीवांसाठी अत्यंत संवेदनशील असतो. या काळात पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी विशेष उपाययोजनांची गरज असते. फर्दापूर परिसरात मागील महिनाभरात रानडुकरांच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पाण्यासाठी जंगलाबाहेर आलेल्या वन्यप्राण्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे दिसून येत असून, वनक्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, वाघूर नदीपात्रातील नीलगायीचे दृश्य पाहून अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. आता केवळ शेतकरीच नव्हे तर मुक्या जीवांचेही डोळे पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागले आहे.
कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवा
जंगलात पाण्याची तीव टंचाई निर्माण झाली आहे. वनविभागाने काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून उन्हाळ्यात त्यामध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. मात्र राखीव जंगलाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने ही संख्या अपुरी पडत आहे. दुर्गम भागात अधिक पाणवठे उभारण्याची गरज असून त्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती कमी होण्यास मदत होईल, असे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले.