नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे पात्र कोरडे; भीषण पाणीटंचाईचे संकट

Nanded news | मुरलीजवळील कोट्यवधींचा बंधारा कोरडा; ईसापुर धरणाचे पाणी शेवटपर्यंत नाही
नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे पात्र कोरडे; भीषण पाणीटंचाईचे संकट
Published on
Updated on

उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांवर यंदाही भीषण पाणीटंचाईचे सावट दाटले असून “नदी गावात, पाणी डोळ्यांत” अशी हतबल करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी, परिसराची जीवनदायिनी असलेली पैनगंगा नदी आज पूर्णपणे कोरडी पडली आहे. ज्या नदीने पिढ्यानपिढ्या गावांची तहान भागवली, तीच नदी आता वाळवंटासारखी ओस पडलेली पाहून नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.

सहस्त्रकुंड धबधब्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मुरली गावालगत २००६ साली माजी जिल्हा परिषद सदस्य भिकू जाधव यांच्या पुढाकाराने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बंधारा आज पूर्णतः कोरडा आहे. या बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही नसल्याने शासनाच्या कामांबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ईसापुर धरणातून सोडले जाणारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत आहे.

लिंगी, देवरंगा, मंगरूळ, वाळकी, परोटी, इस्लापूर, मुरली आणि मुरली तांडा यांसह अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती सुरू आहे. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायी चालावे लागत आहे. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे खोदून, ओलसर मातीतून थेंबथेंब पाणी गोळा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्या प्रत्येक थेंबामागे त्यांची झुंज, त्यांचा संघर्ष आणि जगण्याची धडपड दडलेली आहे.

या भागात पैनगंगा अभयारण्य असल्याने वन्य प्राण्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्याने प्राणी तहानेने व्याकुळ होऊन मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची भीती वाढली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुसरीकडे, जनावरांसाठी पाणी नसल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्याच्या झळा बसताच ही समस्या उग्र रूप धारण करते, मात्र ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना अद्यापही दिसून येत नाहीत. प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. आज गरज आहे ती पैनगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाची, जलसंधारणाच्या प्रभावी उपायांची आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची. अन्यथा, ही तहान फक्त पाण्याची राहणार नाही, तर ती जगण्याची लढाई बनणार आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

या विभागातील खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांचे या गंभीर प्रश्नाकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पैनगंगा नदी अगदी जवळ असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणे ही अत्यंत वेदनादायक व शोकांतिका ठरत आहे.

पैनगंगा नदी जवळ असूनही आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. पुरुष, महिला आणि लहान मुलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जंगलातील वन्य प्राणी व जनावरं तहानेने तडफडत आहेत. शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा परिसरातील सर्व गावांतील नागरिक तीव्र आंदोलन छेडतील.”

युवराज जाधव, मुरली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news