Voting today for 46 Nagar Panchyat in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रच-राराच्या तोफा सोमवारी (दि.१) रात्री उशिरा थंडावल्या. आता मराठवाड्यातील ४६ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये मंगळवारी प्रत्यक्ष मतदान होत आहे. यावेळी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे ४६ नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी २६२ उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यात मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. आता आयोगाकडून नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत प्रचारात उतरत जागोजागी सभा घेतल्या. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
या निवडणुकीसाठी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार सुरू होता. आता मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मराठवाड्यात एकूण ५२ नगरपरिषदा, नगरपंचायतीची निवडणूक होत होती. परंतु ऐनवेळी यातील सहा ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित ४६ ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
निवडणूक स्थगित झालेल्या नगरपरिषदा
लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि निलंगा, नांदेड धर्माबाद आणि मुखेड, हिंगोलीतील वसमत आणि छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री या ठिकाणच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी सोबत मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा ओळ-खीचा इतर कोणताही पुरावा सोबत आणावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त त्रग्रीकेशा भालेराव यांनी केले आहे. मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्या त्या ठिकाणी बुधवारी सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. पहिल्या तीन तासांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाई
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात उद्या कडक पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. शिवाय कार्यक्षेत्रातील उपद्रवी, गुन्-हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. काही जणांना एक दिवसासाठी त्या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे.
रेणापूर पाठोपाठ निलंगा नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर
लातूर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना लातूर जिल्ह्यातील निलंगा उदगीर मधील नगरपरिषदेची पूर्ण तर प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी मतदान तर २१ डिसेंबर रोजी निकाल घोषित होणार आहेत.