Voting for graduates today at 842 centres
छत्रपती संभाजीनगर : पती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील ४१ उमेदवारांसाठी आज (दि. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान होणार आहे. यात ३ लाख २६ हजार ७०१ मतदार आपला हक्क बजावणार असून त्यासाठी गुरुवारी (दि. २२) सकाळीच ८४२ केंद्रांवर ३७४९ मतदान अधिकारी-कर्मचारी मतपेट्या आणि बॅलेट पेपरसह मतदान केंद्रावर सज्ज झाले आहेत.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. ८४२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मराठवाडा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) सतीश चव्हाण यांच्यासह ४१ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी ३ लाख २६ हजार ७०१ मतदार मतदान करणार आहेत. यात ७७ हजार ७१७ महिला, २ लाख ४८ हजार ९७१ पुरुष आणि १३ इतर असे मतदार आहेत.
निवडणूक निरीक्षक व मदत कक्ष
या निवडणूकीचे निरीक्षक म्हणून माधवी खोडे-चावरे यांची नियुक्त्ती आहे. तर रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी असून ९८२२३६६५१९ हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. या निवडणुकीतील मतदान हे मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार असते.
८२०४ मनुष्यबळ तैनात
या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष ९३५ आणि मतदन अधिकारी २८१४ असे ३७४९ कर्मचारी सज्ज झाले आहेत. तर चिकलठाणा एमआयडीसीत होणाऱ्या मतमोजणीसाठी ४४५५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले.