Sambhajinagar News : वाकला जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वाकला जि.प. शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

दोन वर्षांपासून ८ शिक्षकांची पदे रिक्त; अखेर ग्रामस्थांचा संताप अनावर

पुढारी वृत्तसेवा

Villagers lock up Vakla Zilla Parishad School

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाकला येथील जिल्हा परिषद प्रशालेत गेल्या दोन वर्षांपासून तब्बल आठ शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार निवेदने, आंदोलने व उपोषणे करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थ, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीने शुक्रवारी (दि.३) शाळेला कुलूप ठोकत आंदोलन छेडले.

सध्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून, अनेक विषयांचे अध्यापन रखडले आहे. यामुळे विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी शिक्षण विभाग व संबंधित प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक पालक शाळा सोडल्याचा दाखला मागत असल्यात्चेही समोर आले आहे

"शिक्षक द्या, शाळा वाचवा" आणि "विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ बंद करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष

वाकलायेथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या दोन वर्षांपासून तब्बल आठ शिक्षक पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालक, ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार लेखी निवेदन देऊन रिक्त शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली.

मात्र, याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही शिक्षकांच्या रिक्त पदाबाबात काहीच ठोस निर्णय घेतला नाही यामुळे संतप्त वाकला ग्रामस्थांनी भर पावसात शाळेसमोर येऊन शाळेला कुलूप लावून जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केला.

माझ्या स्तरावरून वाकला येथील शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी माझ्या स्तरावर तातडीने तात्पुरती शिक्षक व्यवस्था करण्यात आली असून, पुढील कार्यवाही प्रक्रियेनुसार करण्यात येत आहे.
हेमंत उशीर गटशिक्षणाधिकारी, वैजापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT