Waluj Mahanagar : अवैध धंद्यांविरोधात गावबंद आंदोलन File Photo
छत्रपती संभाजीनगर

Waluj Mahanagar : अवैध धंद्यांविरोधात गावबंद आंदोलन

रांजणगावकर एकवटले : १०० टक्के दुकाने बंद; ग्रामसभेच्या ठरावानंतरही परिस्थिती जैसे थे

पुढारी वृत्तसेवा

Village-wide protest against illegal businesses at Waluj Mahanagar

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: ग्रामसभा व मासिक सभेचे ठराब तसेच १७ निवेदन प्रशासनाला देऊनही रांजणगाव (शे.पुं.) येथे सुरू असलेले अवैध धंदे बंद झाले नाहीत. येथील अवैध दारू विक्रीसह बेकायदेशीरीत्या सुरू अस लेले इतर अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी रांजणगावकर एकवटले आहेत. ग्रामपंचायतीने दिलेल्या गाव बंद आंदोलनाला व्यावसायिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत सोमवारी (दि. २२) सकाळपासून सायंकाळपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, ग्रामपंचायतीसमोर जमा झालेल्या महिलांनी रांजणगाव येथील अवैध धंदे बंद करा, असे फलक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

वाळूज एमआयडीसीमुळे रांजणगावची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. गावात १५ ते २० ठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने असून, यातील काही दुकाने धार्मिक स्थळ, शाळा परिसर तसेच नागरी वसाहतीमध्ये आहेत. रात्री उशिरापर्यंत या भागात मद्यपींचा वावर असतो. यामुळे शालेय विद्यार्थिनी, कामावर जाणाऱ्या महिलांना मद्यपींचा मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून संबंधित पोलिस ठाणे पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वेळ ोवेळी निवेदन देण्यात आली आहेत, मात्र संबंधितांकडून याची दखल घेतली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी गावबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला गावातील सर्वच व्यावसायिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली होती.

दरम्यान, सकाळी दहा वाजेच्या सुमारास सरपंच कविता हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तिशाही, दत्तू हिवाळे, माजी पं. स. सदस्य दीपक बडे, बाबूराव हिवाळे, प्रभाकर महालकर, ग्रा.पं. सदस्य, साईनाथ जाधव, पंकज हिवाळे, मोहिनीराज धनवटे, गोरखनाथ हिवाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी गावात सहजासहजी दारू मिळत असल्याने अल्पवयीन मुलांना दारू पिण्याचे व्यसन जडत असल्याने तरुण पिढी वाईट मार्गावर जात आहे. शिवाय घरातील कर्ता पुरुष दारूच्या आहारी गेल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला, तरुणी व विद्यार्थीनींना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. असे सांगून आपला संताप व्यक्त करत येथील अवैध दारू विक्री, उघड्यावरील मांस, मच्छी विक्री तसेच गावात सुरू असलेले बेकायदेशीर धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी केली.

दरम्यान सरपंच कवीता बाबुराव हिवाळे यांनी या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अजय बगाटे, तालुका आरोग्य अधिकारी तुपे यांना दिले. यावेळी माजी उपसरपंच भरत गरड, दीपक सदावर्ते, शरद कीर्तिकर, जावेद सय्यद, मोहिनी बडे, रमा उबाळे, संगीता पंडित, जे. के. अमराव, अॅड. अमोल ठाकूर, अॅड, मनोहर गवई, विजय शिनगारे, सय्यद अलीम, आदींसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

तर तीव्र आंदोलन ग्रा.पं.ने आतापर्यंत ग्रामसभेचे ६ ठराव तसेच १७ निवेदने येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी संबंधितांना दिली आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही. आठ दिवसांत येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार.
दीपक बडे, माजी पं.स. सदस्य

जनहित याचिका दाखल करणार

गावात सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहोत. कधी-कधी संबंधितांकडून थातुर-मातुर कारवाई होते. त्यानतंर काही दिवसांनी पुन्हा हे धंदे सुरू होतात. आठ दिवसांत येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.

अवैध धंद्यांचे माहेरघर औद्योगिक क्षेत्रामुळे वाळूज महानगराची ओळख जगाच्या नकाशावर आहे. मात्र अवैध धंद्याचे माहेरघर बनत चालले आहे. या व्यावसायीकांकडून मोठा मलिदा मिळत असल्याने संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे.
दत्तू हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT