Vikhe Patil: Planning will be done to ensure that the available water reserves are sufficient by August 2027
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील पाणीस्थिती गंभीर झाली आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करावे. उपलब्ध पाण्याचा प्राधान्यक्रम पिण्यासाठी ठेवावा. त्यानंतर सिंचन आणि उद्योगासाठी पाण्याचा विचार करावा लागणार असून, सध्याची परिस्थिती पाहता सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनाचा फेरविचार करावा लागेल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी सांगितले.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक सिंचन भवन येथे झाली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, मराठवाड्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे धरणनिहाय नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक धरणातील पाणीसाठा, उपलब्ध पाणी आणि त्याचा पुढील वापर याचा आढावा घेऊन आठ दिवसांत अहवाल सादर करावा. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असून, त्यानंतर उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच जायकवाडीवरील सौरऊर्जा प्रकल्पासह मोठ्या प्रकल्पांबाबत कायदेशीर पूर्तता करून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पांचे ऑडिट होणार !
मराठवाड्यातील विविध प्रकल्पांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. सुरू असलेले, रखडलेले तसेच २०२८ पर्यंत पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांची सद्यःस्थिती तपासण्यात आली. प्रत्येक धरण आणि प्रकल्पाचे ऑडिट केले जाणार आहे. प्रकल्प उभारताना असलेली परिस्थिती, सध्याची स्थिती आणि संबंधित भागावर झालेला परिणाम याचा अभ्यास केला जाईल. तसेच प्रकल्पामुळे झालेला सामाजिक व आर्थिक परिणामही तपासण्यात येणार.
जलनीतीत बदलाची शक्यता
धरणांतील पाण्याचे नियोजन करताना यापूर्वीच्या जलनीतीचा फेरविचार करावा लागू शकतो, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाणी प्रथम पिण्यासाठी राखीव ठेवावे लागेल. त्यानंतर सिंचन आणि उद्योगाचा विचार करता येईल. मात्र, मराठवाड्यातील सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.