Vehicle driven at BJP corporator during Tricolour rally
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तिरंगा रॅलीसाठी जाणाऱ्या नागरिकांच्या गर्दीत भरधाव वेगाने आलेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विनाक्रमांक ट्रॅक्टर चालकाला हटकले असता, त्याने भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर जाणीवपूर्वक ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना शुक्रवृरी (दि.१४) दुपारी २:१० वाजेच्या सुमारास छत्रपती कॉलेजजवळ घडली. सुदैवाने यातून राठोड थोडक्यात बचावले असून, याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश प्रभाकर खरात (२४, रा. राजनगर) असे आरोपी टँकर चालकाचे नाव आहे.
भाजपचे नगरसेवक प्रमोद प्रल्हाद राठोड (५०, रा. एन-३ सिडको) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ते प्रभाग क्रमांक २३ चे नगरसेवक आहेत. औरंगपुरा येथे जाणाऱ्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना ते गर्दीतून मार्ग काढण्यासाठी सहकार्य करत होते. त्यावेळी समोरून महानगरपालिकेचा पाणीपुरवठा करणारा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर (पाण्याचा टँकर) भरधाव वेगाने आला.
खूप गर्दी असल्याने राठोड यांनी त्याला ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. मात्र, चालकाने उद्धट भाषेत 'मी असेच चालवणार, तुम्हाला काय करायचे ते करा,' असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच, जाणीवपूर्वक जिवे मारण्याच्या उद्देशाने राठोड यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. राठोड यांनी तत्काळ बाजूला उडी घेतल्याने ते बचावले.
या घटनेनंतर रॅलीतील नागरिकांनी आरडाओरडा करत ट्रॅक्टर थांबवला व चालकाला पकडून ठेवले. या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी ट्रॅक्टर आणि चालक गणेश खरात याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास हवालदार राठोड करत आहेत.