

Give 100 percent fee waiver in higher education to boys like girls!
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलींप्रमाणे मुलांनाही उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफी देण्यात यावी, महाविद्यालयांच्या विकासनिधीची पूर्तता शासनाने करावी, पहिली ते बारावीपर्यंत एनसीईआरटीची पुस्तके लागू करावीत, तसेच केजी ते पीजीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बससेवा मोफत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी 'हल्लाबोल युवा संघटने' तर्फे क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनाला शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला. शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने संघटनेने या मागण्या शासनासमोर मांडल्या. मुलींना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींच्या धर्तीवर मुलांनाही उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफीचा लाभदेण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारा विकासनिधी विद्यार्थ्यांकडून न घेता शासनाने भरावा, तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक शिक्षणासाठी उपयुक्त ठरणारी पहिली ते बारावीपर्यंत एनसीईआरटीची पुस्तके लागू करावीत, अशी मागणीही करण्यात आली. केजीपासून पीजीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी, या मागणीलाही आंदोलनात विशेष महत्त्व देण्यात आले. यावेळी हल्लाबोल युवा संघटनेचे संस्थापक प्रा. रवींद्र बनसोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
मुलांनाही मुलींप्रमाणे उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफी द्यावी.
महाविद्यालयांचा विकासनिधी शासनाने भरावा.
पहिली ते बारावीपर्यंत एनसीईआरटीची पुस्तके लागू करावीत.
केजी ते पीजीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बससेवा द्यावी.
विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक खर्चाचा आर्थिक भार कमी करावा