बाजार समितीत वाढली भाजीपाल्याची आवक file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बाजार समितीत वाढली भाजीपाल्याची आवक

श्रावण घेवड्याचे दर निम्यावर : लिंबूसह बहुतांश भाज्यांचे भाव स्थिर, ग्राहकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

Vegetable arrivals increase at the market committee

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या जाधववाडी येथील घाऊक भाजीमंडईत विविध भाज्यांची आवक वाढल्याने बाजारातील दर स्थिरावले आहेत. विशेषतः श्रावण घेवड्याच्या वाढलेल्या आवकमुळे त्याचा दर अवघ्या काही दिवसांत ३०० रुपयांवरून १६० रुपये प्रतिकिलोवर घसरला असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लिंबाची आवक वाढल्याने त्याचेही भाव नियंत्रणात आले आहेत.

पावसाअभावी मागील आठवड्यांपर्यंत भाजीपाल्यांच्या दरात तेजी पहायला मिळाली. यात श्रावण घेवड्याचे भाव प्रतिकिलो ३०० रूपये होते. मात्र आठवडाभरात घाऊक भाजीमंडई जाधववाडीसह औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर, मुकुंदवाडी आदी बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची मुबलक उपलब्धता असल्याने बहुतांश भाज्यांच्या दरात स्थिरता दिसून येत आहे.

यात श्रावण घेवड्याचे दर निम्याने घटले असून १६० प्रतिकिलोवर आले आहेत. तर बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ३० ते ४० रुपये, भोपळा व काकडी प्रत्येकी ४० रुपये, टोमॅटो ५० रुपये, तर वांगे, भेंडी, गाजर, कोबी, दिलपसंद आणि लिंबू प्रत्येकी ६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. कारले, हिरवी मिरची आणि सिमला मिरची ७० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. यासोबतच पालेभाज्यांच्या दरातही स्थिरता असून मेथीची जुडी २० ते २५ रुपयांना, तर पालक, कोथंबीर, शेपू आदी पालेभाज्या १५ रुपये जुडी दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे दैनंदिन भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सध्या काहीसा दिलासा मिळत आहे.

आले-लसूण अद्याप महागच

बाजारात बहुतांश भाज्यांचे दर स्थिर असले तरी आले आणि लसणाच्या किमतीत मात्र तेजी कायम आहे. दर्जानुसार आले २५० ते ३०० रुपये, तर लसूण ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. याशिवाय वाल, गिलके आणि दोडके ८० रुपये, तर शेवगा १२० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असून, या दरात विशेष बदल झालेला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT