Various Programs on the Occasion of Shri Ram Navami: Crowds of Devotees at Kiradpura Temple
संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जय श्री राम... जय जय श्रीराम, सियावर प्रभू रामचंद्र की जयच्या गजरात गुरुवारी (दि. २६) शहर राममय झाले. रामजन्मोत्सवानिमित्त किराडपुरा, कैलासनगर, समर्थनगर, गुरुगोविंदसिंगपुरा परिसरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून रामलल्लाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री शहरातील विविध भागांतून मिरवणुका निघाल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात हजारो रामभक्तांनी जल्लोष करत प्रभू श्रीरामाच्या जयघोषात याप्रसंगी परिसर दणाणून सोडला.
विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी अन्नदान, रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली. शहरातील प्रमुख राम मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंत्रोच्चारात श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करून पूजा-अर्चा करण्यात आली.
दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. जय श्रीरामाच्या गजरात वातावरण दुमदुमले. त्यानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागांतून रथयात्रा, शोभायात्रा आणि मिरवणुका काढण्यात आल्या. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या भव्य मूर्ती असलेल्या सजविलेल्या वाहनांनी भाविकांचे विशेष आकर्षण ठरले.
किराडपुरा राममंदिरात जन्मोत्सव
श्रीरामचंद्र मंदिर (म), बालाजी ट्रस्टच्या वतीने श्रीराम नवमी जन्मोत्सव श्रीराम मंदिर, जसवंतपुरा (किराडपुरा) येथे साजरा करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पुजारी विकास पालकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर दुपारी बारा वाजता आरती करून जय श्रीराम असा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, माजी आमदार संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, दयाराम बसैये, उत्तमराव मनसुटे, मानसिंग पवार, पृथ्वीराज पवार, माधुरी अदवंत, शिवाजी दांडगे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरण तयार झाले होते. यावेळी हजारो भाविकांनी रामनवमीनिमित्त दुपारपर्यंत दर्शन घेतले. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचा प्रसाद बनविण्यात आला. मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी राम मंदिर परिसरात भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
राजाबाजार येथून निघाली भव्य मिरवणूक
नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल यांच्या वतीने संस्थान गणपती, राजाबाजार येथून रामजन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक राजाबाजार, शहागंज, सराफा बाजार, सिटी चौक, मच्छली खडकमार्गे कुंभारवाडा येथील राम मंदिरात समारोपास आली. मिरवणुकीत विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तसेच श्रीरामाचे आकर्षक देखावे भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. हजारोंच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम आदी जयघोषाने परिसर दणाणून गेला. प्रभू श्रीरामाच्या भक्तिगीतांवर रामभक्तांनी उत्स्फूर्त नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला.
रामराज्य ग्रुपतर्फे जन्मोत्सव उत्साहात
श्रीराम नवमीनिमित्त शहरात रामराज्य ग्रुपतर्फे भव्य प्रभू श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तरुण पिढीत प्रभू श्रीरामांचे विचार रुजवण्याचे आवाहन केले. रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामा मुळे यांनी कार्यक्रमाची माहिती देत उपक्रमांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमात सर्व रोगनिदान शिबीर, रक्तदान शिबीर, सीता-राम पथनाट्य, महाआरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला. मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोककलेच्या कार्यक्रमात पोवाडा, गवळण, शाहिरी आदी विविध कलांचे सादरीकरण झाले. विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रभू श्रीरामाचा डिजिटल देखावा
देवेंद्र सेवा महोत्सवाचे संस्थापक तथा मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रामजन्मोत्सव उत्साहात पार पडला. क्रांती चौकात साकारण्यात आलेला प्रभू श्रीरामाचा डिजिटल देखावा डोळ्यांचे पारणे फेडणारा व भाविकांचे मुख्य आकर्षण ठरला. यावेळी धार्मिक कार्यक्रम, आकर्षक सजावट आणि विविध उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. उत्सव समितीमध्ये कुणाल गिल यांनी अध्यक्ष म्हणून नेतृत्व केले, तर हर्षद अडकिने यांनी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली. शिवा शेजवळ यांनी सचिव, आकाश नवगिरे यांनी सहसचिव, संकेत डोईफोडे यांनी कार्याध्यक्ष, तर प्रतीक लोखंडे यांनी माध्यम प्रमुख म्हणून काम पाहिले. उत्सवाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते.