Vanchit's Jan Aakrosh Morcha against RSS
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला विरोध करणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचा निषेध आणि आरएसएसवर बंदीच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२४) सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिसांचा मनाई आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला.
आंबेडकरी कार्यकर्त्यांवर उस्मानपुरा आणि वेदांतनगर पोलिस ठाण्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.२३) सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने क्रांती चौकात निदर्शन केली.
तर शुक्रवारी सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून आरएसएसच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी परवानगी नाकारूनही मोर्चा काढण्यावर वंचित ठाम राहिल्यामुळे रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकडीसह क्रांती चौक आणि आरएसएसच्या कार्यालयाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा मोर्चा अडवण्यासाठी क्रांती चौक, जालना रोड, विवेकानंद महाविद्यालयाजवळील चौक तसेच आरएसएसच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग केले होते.
मोर्चा अर्ध्यातच अडवला
क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर पोलिसांनी अडवला. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि वंचितच्या कार्यकर्त्यांत चर्चा झाली. आरएसएसने भारताच्या तिरंग्याचा सन्मान करावा, कायद्यानुसार नोंदणी करावी, या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरल्याने पोलिसांनी सुजात आंबेडकर, शमिभा पाटील आणि अमित भुईगळ यांना पोलिसांच्या वाहनातून विवेकानंद महाविद्यालयापर्यंत नेण्यात आले. आरएसएसच्या कार्यालयात निरोप पोहोचलवला, परंतु त्यांचा एकही कार्यकर्ता न आल्याने पोलिसांनी वंचितने आणलेले साहित्य आरएसएसच्या कार्यालयांवर पोहोचवण्याचे आश्वासन दिल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तिरंगा झेंड्यासह इतर साहित्य पोलिसांच्या स्वाधिन केले.