रोटेगावजवळ आयशरचा चुराडा, तर जांबरगाव पॉइंटवर पिकअप थेट शेतात शिरला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident : वैजापूर परिसरात दोन भीषण अपघात

दोन गंभीर तर अन्य दोन किरकोळ जखमी; जखमींवर संभाजीनगर येथे उपचार

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर: वैजापूर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी ट्रक-पिकअप आणि आयशर ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातांत दोघे गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. वैजापूर-गंगापूर रोडवरील समृद्धी महामार्गाच्या जांबरगाव पॉइंटजवळ शुक्रवारी रात्री पिकअप आणि ट्रकची धडक झाली, तर रोटेगाव शिवारातील उड्डाणपुलाजवळ शनिवारी पहाटे आयशरने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. दोन्ही अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पिकअप थेट शेतात

वैजापूर-गंगापूर रोडवरील जांबरगाव पॉइंटजवळ शुक्रवारी रात्री ट्रक आणि पिकअप वाहनाचा अपघात झाला. गणेश फकिरचंद खैरनार (वय ३१, रा. हनुमंतगाव) हा पिकअप घेऊन वैजापूरच्या दिशेने येत होता. याचवेळी ट्रक समृद्धी महामार्गाच्या दिशेने जात असताना पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप ट्रकच्या मागील चाकाला जाऊन धडकली.

या धडकेत ट्रकचे चाक फुटले, तर पिकअप वाहन रस्त्याच्या खाली शेतात जाऊन पडले. या अपघातात गणेश खैरनार गंभीर जखमी झाला. त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला छत्रपती संभाजीनगर हलविण्यात आले.

आयशरचा चुराडा

दुसरा अपघात शनिवारी (दि. २४) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रोटेगाव शिवारातील उड्डाणपुलाजवळ घडला. उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना भरधाव आयशरने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात आयशरच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या घटनेत आयशरचा क्लीनर गौरव समाधान काकडे (वय २३, रा. चिखली, जि. जळगाव) गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. आयशर चालक शेख जुबेर शेख वजीर (रा. दाताळा, ता. मलकापूर) आणि ट्रॅक्टरवरील भाऊसाहेब राठोड (रा. कासारी, ता. नांदगाव) यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT