वैजापूर, पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील गुटख्याचा प्रश्न काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात गाजला होता. वैजापूर पोलिसांनी बुधवारी (दि.२०) मोठी कारवाई करत तब्बल ६३ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी टेम्पो चालक छोटेलाल प्रसाद गोंड (रा. पकडी, पोस्ट फेफाणा, ता. व जि. बलिया, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गुप्त खबऱ्यामार्फत कळले की, गंगापूरकडून वैजापूरमार्गे कोपरगावकडे आयशर टेम्पो (एमएच ०४ एलई ३९५९) द्वारे प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या नेण्यात येत आहे. ताईतवाले यांच्या पथकाने बुधवारी सकाळी वैजापूर-कोपरगाव रोडवरील कादरी मोटर गरेजसमोर सापळा रचला. तपासणीदरम्यान वाहनातून वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा असल्याचे समोर आले.
चौकशीत चालक छोटेलाल प्रसाद याने हा गुटखा अमरावतीहून मुंबईकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ ६३ लाख रुपयांचा गुटखा आणि २० लाख रुपयांचे वाहन असा एकूण ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोउपनि युवराज पाडळे, आर.आर. जाधव, हवालदार अमोल राजळे, योगेश झाल्टे, कुलदीप नरवडे, प्रशांत गिते, अजित नाचन व सचिन रत्नपारखे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही धडक कारवाई केली.
जर गुटखा सहजपणे तालुक्यासह जिल्हाभरात मिळत असेल, तर अन्न आणि औषध प्रशासन नेमके काय करते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पोलिसांनी दरवेळी अशी कारवाई करून गुटख्याचे ट्रक पकडावेत आणि अन्न आणि औषध प्रशासनाने मात्र केवळ पंचनामा करायला हजर व्हावे, ही व्यवस्था टिकवायची का? प्रशासनाची ही ढिलाईच तंबाखू माफियांना बळ देत आहे का? असा सर्रास आरोप नागरिक करत आहेत. गुटख्यावरची बंदी केवळ कागदावर राहू नये, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी याच विभागाला जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी होत आहे.