प्रतिनिधी – नितीन थोरात, वैजापूर
राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन उत्साहात पार पडले असताना वैजापूर पोलिसांनी आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत वेगळेपण जपत समाजप्रबोधनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. पारंपरिक डीजे, ढोल–ताशांचा जल्लोष जपत त्यांनी व्यसनमुक्ती, सायबर गुन्हे आणि कायदेशीर जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला.
वैजापूर पोलिसांनी एक दिवस उशिराने गणेश विसर्जन मिरवणूक काढत, ती केवळ नाचगाण्यापुरती न ठेवता समाजासाठी संदेश देणारी बनवली. “माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला” – हा संदेश मिरवणुकीत ठिकठिकाणी झळकताना दिसला.
जनतेमध्ये व्यसनमुक्तीची भावना निर्माण व्हावी, सायबर फसवणुकीपासून लोक जागरूक व्हावेत, आणि कायद्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या हेतूने ही मिरवणूक आयोजित केली गेली होती.
या मिरवणुकीमध्ये केवळ पोलीसच नव्हते तर अनेक मान्यवरही सहभागी झाले.
खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी स्वतः उपस्थित राहून पोलिसांच्या उपक्रमाचे कौतुक केले. एवढंच नव्हे, तर त्यांनीही पोलिसांसोबत ठेका धरत नृत्यात सहभागी होत मिरवणुकीची रंगत वाढवली.
पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मिरवणुकीचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर नागरिक या उपक्रमाचे व्हिडिओ, फोटो शेअर करत आहेत आणि “वैजापूर पोलिसांची मिरवणूक म्हणजे खरा आदर्श” अशा प्रतिक्रिया देत आहेत.
पारंपरिक मिरवणुकीला सामाजिक जाणिवांची जोड देणारा हा प्रयोग फक्त वैजापूरपुरता मर्यादित न राहता आता संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या उपक्रमामुळे पोलीस विभागाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढल्याचे चित्र आहे.