Vaijapur Onion trader cheated of Rs. 30 lakhs
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा महिला कांदा व्यापाऱ्याची एकाने तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोहम्मद फजल पाशा (कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील तृप्ती दीपक वावरे या मागील तीन वर्षांपासून वैजापूर कांदा मार्केट येथे कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांच्याकडे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अधिकृत परवाना आहे. याशिवाय त्यांचा अंदरसुल येथेही कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांच्या मुलाचा वैजापूर येथे वजन काटा आहे.
मागील वर्षी २५ ऑगस्टला त्यांच्याकडे कर्नाटक येथील मोहम्मद फजल पाशा आला. सुरुवातीला त्याने त्यांच्याकडून अडीचशे क्विटल कांदा खरेदी करून त्यांना तीन लाख ३१ हजार ४७० रुपये अदा केले. यानंतर त्याने वावरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून वेळोवेळी पैसे अदा करून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर त्याने २५ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वावरे यांच्याकडून कांदा खरेदी केला. या काळात त्याने ३० लाख ४१ हजार १७४ रुपये बाकी ठेवले. दरम्यान बाकी असलेल्या पैशांसाठी तृप्ती वावरे यांनी त्याला फोनवर संपर्क केला. मात्र त्यांना पैसे मिळाले नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.