वैजापूर : तालुक्यातील बोरसर येथील शांतीसदन प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करून कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत धर्मांतर करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून विरगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदाम उबाळे (रा. माळीघोगरगाव), फादर जेरॉल्ड रिबेलो (रा. बोरसर, मूळ रा. वसई, मुंबई), फादर आशिष म्हस्के (रा. माळीघोगरगाव), संजय रुपेकर (रा. सेंट थॉमस चर्च, सेव्हन हिल, छत्रपती संभाजीनगर) आणि विनोद शेळके (रा. जामगाव, ता. गंगापूर, मूळ रा. संगमनेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सन २०२४ पासून ४ जुलै २०२६ या कालावधीत बोरसर व माळीघोगरगाव येथे संशयित आरोपींनी संगनमत करून घटनेतील फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती करून कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी 'धर्मांतर करावे लागेल. अथवा पैसे द्यावे लागतील' असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध धर्मांतर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि पी. आर. भिवसने करीत आहेत.