नांमका कार्यालयासमोर उपोषणस्थळी बोलताना आमदार रमेश बोरनारे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Water Issue : पाणी मिळाले नाही तर सर्वांच्या आधी मीच रस्त्यावर उतरणार

आमदार रमेश बोरनारे यांची ग्वाही; आंदोलकाचे उपोषण सुरूच, वैजापुर तालुक्यात सात ठिकाणी रास्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : वैजापूर आणि गंगापूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठीच्या लढ्याला आता लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाचे आश्वासन मिळाले आहे. आगामी बैठकीत नांदूर मधमेश्वर कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर सर्वांच्या आधी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, अशी ग्वाही आमदार रमेश बोरनारे यांनी दिली. मात्र, केवळ बैठकीचे आश्वासन पुरेसे नसल्याचे सांगत आंदोलक पंडित शिंदे यांनी बेमुदत उपोषण मागे घेण्यास नकार दिला.

नांदूर मधमेश्वर कालव्यातून वैजापूर व गंगापूर तालुक्याला रब्बी हंगामासाठी तसेच पिण्यासाठी पाणी सोडावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबर रोजी आधार जलदूत समितीचे पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. मात्र, ठोस निर्णय किंवा आश्वासन न मिळाल्याने त्याच दिवशी सायंकाळपासून नांदूर मधमेश्वर कालवा विभागाच्या कार्यालय परिसरात शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रमेश बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब जगताप आणि राजेंद्र साळुंके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी बोरनारे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मुंबई येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन रब्बी हंगामासाठी दोन आणि पिण्यासाठी दोन अशी एकूण चार आवर्तने सोडण्याची मागणी केली होती.

आपल्या सात वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पाण्याबाबत कधीही अशी अडचण निर्माण झाली नव्हती. मात्र, पाण्यावर विविध आरक्षणे असतानाही वैजापूर आणि गंगापूर तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.

जलसंपदामंत्र्यांसोबत नाशिक येथे होणारी बैठक राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रद्द झाली. मात्र, येत्या दोन दिवसांत छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.

निर्णय झाला नाही, तर मी स्वतः सर्वात अगोदर रस्त्यावर उतरेन, असे बोरनारे यांनी स्पष्ट केले. मात्र, आंदोलकांनी ऑनलाइन बैठकही घेता येऊ शकते, असे सांगत केवळ बैठकीच्या आश्वासनावर माघार घेण्यास नकार दिला.

ठिकठिकाणी रास्ता रोको !

दरम्यान, पाण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी तालुक्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यात सहा ते सात ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न आता केवळ उपोषणापुरता मर्यादित न राहता तालुकाभर पेटू लागल्याचे चित्र आहे.

किमान शब्द तरी टाका !

यावेळी आमदार बोरनारे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली. आंदोलन, अडचण किंवा अन्य प्रश्न असतील तर किमान माझ्या कानावर तरी घाला. शिपायापासून सर्वांना निवेदन दिले जाते ; मग मला का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी येवला येथे आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी अडवल्याची माहिती मिळताच आपण स्वतः तेथे पोहोचलो होतो. मात्र, त्यावेळीही कोणी आपल्याला कल्पना दिली नव्हती, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एकमेकांशी संवाद साधल्यास अनेक अडचणी सुटू शकतात, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT