वैजापूर : रोहित अनिल पठारे खूनप्रकरणातील अटकेत असलेल्या अमन उंटवाळ, आनंद मथुरे याच्यासह आठही आरोपींना वैजापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Rohit Pathare Case : वैजापुरात अटकेतील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

ग्रामीण पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह; आतापर्यंत १० आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

वैजापूर : वैजापूर शहरात भडकलेल्या गँगवॉरमध्ये रोहित पठारे या तरुणाच्या खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद वैजापूर येथे उमटले असून तणाव वाढत चालला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आणखी आठ आरोपींना परराज्यांतून व विविध भागांतून बेड्या ठोकल्या आहेत. यापूर्वी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ७) सर्व आरोपींना वैजापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपींना न्यायालयात नेण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातून बाहेर काढत असताना संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी आरोर्पीच्या दिशेने धाव घेत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रोहितच्या निघृण खुनानंतर शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नागरिकांनी जमून घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. दुपारी सर्व आरोपींना कडक पोलिस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यासाठी व्हॅनकडे नेले जात असताना, जमावातील संतप्त नातेवाईक आणि तरुणांचा संयम सुटला. "रोहितचे मारेकरी समोर आणा" अशा घोषणा देत जमावाने थेट आरोपींच्या अंगावर धावून जात मारहाणीचा प्रयत्न केला.

बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्काळ कडे करत आंदोलकांना रोखले आणि आरोपींना वाहनात बसवून न्यायालयात रवाना केले. या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेला अमन उंटवाळ हा शहर टाकळी येथील एका निर्जनस्थळी घरात लपून होता. तर इतर ७ आरोपीना पोलिसांनी परराज्यांत व वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन ताब्यात घेतले. गणेशोत्वसात झाला होता गँगवॉर येवला रोडवरील जुन्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील वैमनस्यातून दोन गटांत ३१ ऑक्टोबर रोजी रक्तरंजित संघर्ष झाला होता.

हल्लेखोरांनी रोहित पठारे याचे दोन्ही पाय दगडाने ठेचून काढले, तर बर्फ फोडण्याच्या टोकदार हत्याराने त्याच्या शरीरावर सपासप वार केले होते. तडफडणाऱ्या रोहितने पाणी मागितले असता त्याच्या तोंडात लघुशंका केल्याचा संतापजनक व क्रूर प्रकार घडला होता. त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत रोटेगाव रोडवर फेकून देण्यात आले होते. उपचारादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.

आंदोलनाचा भडका अन् अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

आरोपी मोकाट असल्याने वैजापूर शहर बंद ठेवत संतप्त नातेवाईक व नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. एका संतप्त आंदोलकाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. स्वतः पोलिस अधीक्षकांना पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन आरोर्पीना अटक करू असा शब्द दिल्यानंतर काही काळ तणाव निवळला होता. मात्र, आरोपी दिसताच पुन्हा नातेवाईकनाचा उद्रेक झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अटकेतील आरोपींची नावे

या धडक कारवाईत अमन सत्यपाल उंटवाळ, आनंद संतोष मथुरे ऊर्फ राजपूत, अमर मदनसिंग राजपूत, शंकर ऊर्फ प्रतीक राजू राजपूत, गजू ऊर्फ गजेंद्र रवींद्रसिंग राजपूत, क्रिश प्रीतमसिंग राजपूत, लोकेश ऊर्फ सोनू गबरसिंग राजपूत आणि प्रमोद ज्ञानेश्वर वाघचौरे या आठ जणांना अटक करण्यात आली. यापूर्वी मयूर बाबासाहेब राहणे (रा. भगाव, ता. वैजापूर) आणि विशाल सामदास कडे (रा. शिवाजीनगर, जुना चांडगाव) यांना अटक करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT