संभाजीनगर आमच्या हृदयात; काहीच कमी पडू देणार नाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis : संभाजीनगर आमच्या हृदयात; काहीच कमी पडू देणार नाही

मुख्यमंत्री फडणवीस यांचे पालकमंत्र्यांना आश्वासन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण

पुढारी वृत्तसेवा

Unveiling of the statue of former Chief Minister Vasantrao Naik

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचे पाच प्रमुख प्रवेशद्वार सुसज्ज करण्यासाठी महापालिकेने ६ हजार बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. त्यामुळे आता या रस्त्यांसाठी ३५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली. त्यावर छत्रपती संभाजीनगर हे आमच्या हृदयात असून, या शहराला कधीच काही कमी पडू देणार नाही, असे आश्वासन रविवारी (दि.१६) सिडको चौकातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, माजी मंत्री खासदार संदीपान भुमरे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, विवेक राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या वतीने जालना रोडवरील सिडको चौकात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पूर्वी हा पुतळा अतिशय अडगळीत होता. परंतु आता मुख्य चोकात पुतळा उभारला असून, या पुतळ्याचे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, सर्व लोकप्रतिनिधींच्या संमतीने शहर सुदर करण्यासाठी रस्त्यासाठी ३५०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करून दूरदृष्टीचे नेते असल्यामुळेच त्यांनी राबवलेल्या कृषी विकासाच्या योजनांचा आजही विचार होतो, असे सांगत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेचा उल्लेख केला. त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांचा उल्लेख करीत, छत्रपती संभाजीनगर आमच्या हृदयात असून, या शहराला कधीच काही कमी पडू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. परंतु निधी देण्याबाबत उल्लेख करणे टाळले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी केले. यावेळी बंजारा समाजाचे अनेक नागरिक उपस्थित होते. यासोबतच क्रांती चौकात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेच्या कमल तलावाच्या पुनरुज्जीवन कामाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून शहरात हजारो कोटींची गुंतवणूक आली आहे. या उद्योजकांसाठी महापालिकेने शहरातील रस्ते सुसज्ज करण्यासाठी ६ हजार अतिक्रमणे काढली. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला देश-विदेशांतून नागरिक येणार आहेत. हे नागरिक शहरालाही भेट देतील, त्यामुळे येथील रस्त्यांसाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री शिरसाट यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT