विजेच्या कडकडाटासह शहरात अवकाळी पाऊस बरसला file photo
छत्रपती संभाजीनगर

Unseasonal rain : विजेच्या कडकडाटासह शहरात अवकाळी पाऊस बरसला

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पावसाने सोमवारी (दि.३०) पुन्हा एकदा शहराला चिंब भिजवले.

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal rain lashed the city, accompanied by thunder and lightning

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पावसाने सोमवारी (दि.३०) पुन्हा एकदा शहराला चिंब भिजवले. दुपारी कडक ऊन पडले असताना रात्री वादळी वाऱ्यासह अचानक पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. काही वेळातच पावसाच्या सरी कोसळल्याने वाहन चालक, नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. तर अनेक भागांत बत्ती गुलच्या प्रकाराने नागरिक हैरान झाले.

शहराच्या तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठला असताना दहा दिवसांपूर्वी गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला होता. यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन काही प्रमाणात उष्णतेत घट झाली होती. मात्र परत उन्हाचा कडाका वाढून पारा ४० अंशांजवळ गेला होता. सोमवारी शहरात ३७.३ सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, हवामान खात्याने परत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. सोमवारी दुपारी कडक उन्हाच्या कडाक्यानंतर संध्याकाळी वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास शहर व परिसरात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली.

शहरातील चिकलठाणा, सिडको, हडको, लेबर कॉलनी, ज्युबली पार्क, जालना रोड, औरंगपुरा, भावसिंगपुरा, छावणी, सातारा देवळाई, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, उस्मानपुरा व क्रांती चौक अशा सर्वच भागांत विजेच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसाच्या या सरींमुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचले. रस्त्यांवरून पाणी वाहू लागल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.

वातावरणात सुखद गारवा

अचानक आलेल्या पावसामुळे हवामानात बदल होऊन तापमानात घट झाली. दिवसा उन्हाने अंगाची लाहीलाही केली असताना रात्री सुसाट आणि थंड वाऱ्यामुळे गारवा निर्माण झाला.

अनेक भागांत वीज गुल

रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होताच शहरातील अनेक भागांत वीज गुल झाली. काही भागांत पंधरा ते वीस मिनिटांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. तर बीड बायपास येथील माऊलीनगर व परिसरातील वीज तब्बल दोन तासांपासून गायब होती. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान, दिवसभर विविध भागांत वीज गुलचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक घामाघुम झाले होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT