छत्रपती संभाजीनगर : उनो मिंडा कंपंनीने छत्रपती संभाजीनगरातील बिडकीन येथे 550 कोटी रुपये गुंतवणुकीस मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाव्दारे कंपनी इलेक्ट्रिक ड्राइव्ह युनिट्स आणि डेडिकेटेड हायबिड ट्रान्समिशन प्रणालींचे उत्पादन व असेंब्ली करणार आहे. 2028 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
गेल्या काही महिन्यात संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीत टोयोटा, अथर, जेएसडब्ल्यूसह इतर काही मोठ्या कंपन्यांनी ईव्ही वाहन उत्पादनासाठी गुंतवणूक जाहिर केली असून, त्या कंपन्यांचे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. यामुळे संभाजीनगर शहराची इलेक्ट्रिक मोबिलिटी हबकडे वाटचाल सुरू आहे.
येथील बिडकीन औद्योगिक क्षेत्रात युनो मिंडा ऑटो इनोव्हेशन्सकडून ईव्ही पॉवरट्रेन प्रकल्पात मोठी गुंतवणूकीस मंजुरी दिली आहे. नुकतेच भूमिपूजन झाले असून, या प्रकल्पात चारचाकी प्रवासी वाहनांसाठीच्या हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक पॉवरट्रेन उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले जाईल. इलेक्ट्रिक ड्राइव्ह युनिट्स (ईडीयू) आणि डेडिकेटेड हायबिड ट्रान्समिशन (डीएचटी) प्रणालींचे उत्पादन व असेंब्ली केली जाईल.
या भव्य प्रकल्पामुळे मराठवाड्यातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, ऑटोमोबाईल क्षेत्रातील पुरवठादार साखळीला मोठी बळकटी मिळणार आहे.
2028च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन
या प्रकल्पासाठी अंदाजे 5.5 अब्ज म्हणजेच 550 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, या निधीची उभारणी कर्ज आणि इक्विटी (भागभांडवल) यांच्या मिश्रणातून केली जाईल. हा भांडवली खर्च पुढील दोन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने केला जाईल आणि आर्थिक वर्ष 2028 च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.