Unnumbered Hyvas transporting sand illegally speed recklessly
गारज : पुढारी वृत्तसेवा वैजापूर तालुक्यातील झोलेगाव येथील शिवना नदीतून टेंडरच्या नावाखाली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरची हायवा वाहने सुसाट आहेत. वाहनांवर आरटीओ व पोलिसांनी संयुक्त कठोर कारवाई करावी अशी मागणी गारज परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
महिनाभरापासून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा या सुसाट वेगाने धावत असून गावाजवळील गतिरोधक देखील वाहनांचा वेग कमी होत नाही. वाहने अधिक वेगाने धावत असल्याने रस्त्यावर वाळू सांडली जाते. परिणामी या वाळूवरून दुचाकी घसरून कित्येकजण जखमी झाले आहेत. गारज येथील तरुणांनी कित्येक वेळेस सांडलेली वाळू झाडूने जमा करून भरली आहे.
बालसंस्कार शिबिरातील चिमुकल्यांनीही एक दिवस बाजीराव स्वामी समाधी संस्थान मंदिरासमोरील वाळू रात्री भरली होती. एवढे होऊनही महसूल प्रशासन व पोलिस झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे या वाहनांतून वाळू सांडणार व ग्रामस्थ अपघात होऊ नये म्हणून भीतीपोटी ही वाळू रस्त्याच्या कडेला जमा करणार हे नित्याचे झाले आहे.
शिवना नदीतून टेंडरची वाळू भरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नंबर नसल्याने एखादा अपघात झाला तर पोलिस कोणत्या वाहनांवर कारवाई करणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. शासकीय डेपोतून वाहनांमध्ये वाळू भरताना त्यांचे नंबर घेतले जातात. का आणि घेतले जात असतील तर वाहनांवर नंबर का नाही असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना गावाजवळील शाळा, पतसंस्था, बसस्थानक असे रहदारीचे ठिकाण दिसत नाही का असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन अशा जीवघेण्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या सुसाट धावणाऱ्या वाहनांवर आरटीओ व आम्ही उद्यापासून संयुक्त कारवाई करणार आहोत. विना नंबर प्लेट, ओव्हरलोड, अतिवेग अशा वाहनांवर शंभर टक्के कारवाई होईल. तसेच गारज गावाजवळील रहदारीच्या ठिकाणी मोठे गतिरोधक उभारू. मी आज झोलेगाव येथे वाळूने भरलेल्या वाहनांची चौकशी सुरू केली आहे.-वैभव रणखांबे, सहायक पोलिस निरीक्षक शिऊर पोलिस ठाणे
'गारज येथून वाळू वाहतूक करणारे वाहने हे अतिवेगाने धावतात. रस्त्यावर वाळू सांडली जाते. या सांडलेल्या वाळूवरून दुचाकी लगेच घसरते. आतापर्यंत कित्येक पुरुष, महिला जखमी झाले आहेत. अशा वाहनांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे. या वाळूपेक्षा सामान्य जनतेचा जीव महत्त्वाचा आहे.- सोन्याबापू सरोवर, सहायक पोलिस निरीक्षक, माजी चेअरमन