छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाने आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था (धुळे) यांच्याकडे कुशल कामगारांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने १०० कुशल कामगारांची भरती प्रक्रिया रावबण्यात जाहिरातीत विद्यापीठाचे नाव व लोगोचा वापर केला. हे वृत्त दैनिक पुढारीने ३० सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले.
याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजी ठेकेदाराला विना परवाना नाव व लोगो वापरल्याने ५० लाख नुकसान भरपाई व इतर कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
विद्यापीठाने नुकतीच धुळे येथील आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराला १०० कुशल कामगार पुरवण्याची मान्यता दिली आहे. यानंतर ठेकेदाराने विद्यापीठाचा लोगो वापरून अधिकृत वाटेल अशा स्वरूपाची जाहिरात १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली. या नंतर या संस्थेने उमेदवारांचे अर्ज मागवले. त्यांच्या परीक्षा विद्यापीठ परिसरात पार पडल्या. तरीही प्रशासनाला जाहिरातीत आपले नाव व लोगोचा वापर संस्थेने केल्याचे निदर्शनास कसे आले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित करताच मात्र प्रशासनाला जाग आणि तात्काळ ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली. तब्बल महिनाभर प्रशासनाने याकडे डोळेझाक का केली यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
विद्यापीठाची परवानगी न घेता नाव आणि लोगोचा वापर केल्याने धुळे येथील संस्थेला रीतसर नोटीस पाठवली आहे. संबंधित संस्थेकडून दिलेल्या कालावधीत उत्तर आल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.डॉ. संजय कवडे, कुलसचिव