Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात घरफोडीचा थरार; गुजरातमध्ये जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

वेशांतर करून पोलिसांची १५ दिवस पाळत; कारची काच खाली घेतली अन् चोरटे अडकले !

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात दिवसाढवळ्या बंद घरे फोडून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांच्या गुन्हे शाखेने थेट गुजरातमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. या सराईत आणि हायटेक चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क वेशांतर केले आणि १५ दिवस सुरतमध्ये अंडा-ऑम्लेटच्या गाडीवर काम करत पाळत ठेवली. गुरुदास सुरेश कोळी (२८) आणि अमोल गोकुळ जाधव (३३, दोघे मूळ रा. जळगाव, हल्ली मुक्काम जोलवा, ता. पलसाना, जि. सुरत) अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

१९ मार्च रोजी वेदांतनगर परिसरातील इंद्रनील अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या ३ लाख २३ हजार रुपयांची घरफोडी झाली होती. याचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीत एक कार दिसली. ही पाच जणांची टोळी कारने शहरात यायची. एका ठिकाणी कारची काच एका आरोपीने खाली घेतली आणि त्याचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिसांनी तब्बल १५० कॅमेरे तपासले. हा चेहरा यापूर्वी जवाहरनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीशी मिळत-जुळता होता. मात्र हे आरोपी एका ठिकाणी थांबत नसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हते.

वेशांतर करून ठोकला मुक्काम

आरोपींची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी १४ एप्रिल रोजी गुन्हे शाखेचे हवालदार योगेश नवसारे आणि प्रदीप दंडवते यांना सुरत येथे पाठवले. या दोन पोलिसांनी जोलवा गावात चक्क वेशांतर केले. संशयित आरोपींच्या घराजवळच एका अंडा ऑम्लेटच्या गाडीवर त्यांनी काम सुरू केले.

सलग १५ दिवस पाळत ठेवल्यानंतर पक्की खात्री होताच २७ एप्रिल रोजी उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर, संजय गावंडे, विनोद परदेशी, प्रदीप दंडवते, राज- ाराम डाखुरे, सागर पांढरे, अमोल मुगळे, विजय घुगे, संतोष चौरे यांच्या पथकाने धाव घेतली. या दोघांनाही बेड्या ठोकल्या. शहरात आणून न्यायालयात हजर केले असता, ५ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अशी असायची मोडस ऑपरेंडी

ही टोळी अत्यंत सराईत आहे. चोरी करताना ट्रॅक होऊ नये म्हणून ते स्वतःचा मोबाईल वापरत नसत, गरज पडल्यास दुसऱ्यांचे मोबाईल वापरायचे. कारला बोगस नंबर प्लेट लावली जायची आणि टोलनाके नसलेल्या आडवाटांनी ते शहरात प्रवेश करायचे. बंद घर दिसले की लॉकर तोडून थेट पसार व्हायचे.

पोलिसांना गुंगारा देऊन पुन्हा चोऱ्या

आरोपी निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा त्यांच्या मागावर होतीच, मात्र याच काळात या टोळीने पुन्हा शहरात दोन वेळा येऊन घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे. शहरात घरफोडी करण्यासाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून अनेक टोळ्या येतात. यापूर्वी चिकलठाणा भागात तर एका घरफोडीतील आरोपी चक्क विमानाने येऊन चोरी करून गेला होता. या हायप्रोफाईल चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

या टोळीवर ३० गुन्ह्यांची नोंद

या टोळीवर एकट्या नाशिकमध्ये २८, तर छत्रपती संभाजीनगरात २ असे एकूण ३० गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT