Unauthorized layout: Municipality hammered on 858 unauthorized plots in Chikalthane
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विनापरवानगी ले-आऊट विकसित करीत भूखंडांची विक्री करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. चिकलठाणा दक्षिण भागात मंगळवारी (दि. ६) अतिक्रमण विभागाने दोन अनधिकृत ले-आऊटवर कारवाई करीत तब्बल ८५८ भूखंडांवर हातोडा चालविला.
सुमारे १५ एकर क्षेत्रातील या कारवाईमुळे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई केली. प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम राबवितासाठी सवलत योजना जाहीर केली असून भूखंडाच्या गुंठेवारीसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली असून ही सवलत देताना मनपा हद्दीत अनधिकृत प्लॉटिंग रोखण्यासाठी धडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.
त्यानुसार अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई हाती घेण्यात आली आहे. पथकाने मंगळवारी चिकलठाणा दक्षिण भागातील गट क्रमांक ६३८ मध्ये मदनलाल गोवर्धन चांडक (मयत) यांच्या नावे असलेल्या १० एकर २० गुंठे क्षेत्रावर नियमबाह्य पद्धतीने ले-आऊट तयार करण्यात आले होते. येथे २० बाय ३० फूट आकाराचे तब्बल ५९० भूखंड पाडण्यात आले होते. या भूखंडांची विक्रीही करण्यात आल्याचे मनपाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे मनपाच्या पथकाने संबंधित अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली. त्यानंतर गट क्रमांक ६३९ मधील ले-आऊटवरही कारवाई करण्यात आली. रमेश दादाराव जराड यांच्या मालकीच्या ४ एकर २० गुंठे क्षेत्रात २० बाय ३० फूट आकाराचे २६८ भूखंड पाडण्यात आले होते. या भूखंडांची विक्री जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी (जीपीए ) धारक ब्रिजभूषण लोया (मयत) यांच्यामार्फत करण्यात आली होती.
या संपूर्ण अनधिकृत ले-आऊटवरही महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. तसेच प्लॉट विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांनी भूखंड खरेदीपूर्वी जमिनीची कागदपत्रे, आवश्यक परवानग्या आणि लेआउटची वैधता तपासावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन गटांत ८५८ भूखंड
चिकलठाणा दक्षिण भागातील गट क्रमांक ६३८ मध्ये १० एकर २० गुंठ्यांत ५९०, तर गट क्रमांक ६३९ मध्ये ४ एकर २० गुंठ्यांत २६८ भूखंड पाडण्यात आले. दोन्ही ठिकाणी २० बाय ३० आकाराचे प्लॉट असून, एकूण १४ एकर २० गुंठे क्षेत्रावरील या अनधिकृत प्लॉटिंगवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.