Umrah Tour Fraud file photo
छत्रपती संभाजीनगर

Umrah Tour Fraud | तुर्की, उमराहच्या दर्शनाचे आमिष दाखवून भाविकांना घातला तब्बल १० लाखांचा गंडा

बोगस व्हिसा आणि तिकीट ; शिद्रा ट्रॅव्हल्सचा चालक अटकेत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मक्का-मदीना येथे उमराह करण्यासाठी आणि तुर्कीच्या सहलीला नेण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने चक्क बनावट व्हिसा आणि विमानाची बोगस तिकिटे देऊन भाविकांच्या डोळ्यांत धूळफेक केली. हा प्रकार २७ ते ३१ ऑगस्ट २०२५ या काळात शहागंज येथे घडला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.९) गुन्हा दाखल करण्यात आला.

'शिद्रा ट्रॅव्हल्स'चा चालक फैजान खान सुबान खान (३५, रा. मंजरपुरा) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी शेख शरीफ मोहम्मद बकरुद्दीन (५५, रा प्लॉट नं. ५६, मोतीवालानगर) यांच्या तक्रारीनुसार, जुलै २०२५ मध्ये त्यांची ओळख रोशनगेट परिसरातील खान मंजिल येथे 'शिद्रा ट्रॅव्हल्स' चालवणारा आरोपी फैजान खान याच्याशी शहागंज येथे झाली होती.

आरोपीने आपण अनेक भाविकांना तुर्की आणि उमराहला नेल्याचे सांगून शेख यांचा विश्वास संपादन केला. तसेच प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आणि व्हिसा आपण स्वतः काढून देतो, अशी थापही त्याने मारली.

आरोपीच्या भूलथापांना बळी पडून शेख यांनी आपली पत्नी, आई, तीन मुले आणि एक मुलगी अशा कुटुंबातील सात जणांसाठी सहलीचे नियोजन केले. या संपूर्ण प्रवासासाठी आणि कागदपत्रांसाठी आरोपी फैजानने १५ लाख रुपये खर्च सांगितला. शेख यांनी २७ऑगस्ट २०२५ रोजी ६ लाख रुपये आणि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ४ लाख रुपये असे १० लाख रुपये आरोपीला शहागंज भागात दिले. पैसे लाटल्यानंतर आरोपी फैजानने शेख यांना विमानाची तिकिटे, हॉटेल बुकिंगच्या पावत्या आणि व्हिसा दिला. मात्र प्रवासाची वेळ जवळ आल्यावर ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले.

कार्यालय, घराला कुलूप लावून होता गायब

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने रोशनगेट येथील कार्यालय बंद केले होते. घरावरही कुलूप ठोकून तो गायब झाला होता. त्याचा मोबाईलही 'स्विच ऑफ' होता. दरम्यान, गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी उपनिरीक्षक भागवत मुठाळ यांनी फैजानला बेड्या ठोकल्या. या भामट्याने अशाच प्रकारे शहरातील आणखी काही नागरिकांना गंडा घातल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT