Uddhav Thackeray Criticism of the government
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे. ते खरोखरच हिंदुत्वनिष्ठ असतील तर त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्यामधील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.८) पक्षाच्या आयोजित मेळाव्यात केले. निवडणुकीच्या तोंडावर आता आयातीवर लक्ष देऊ नका, जुन्यांना संधी द्या, पक्षाला नवी पालवी फुटू द्या, अशी सूचनाही ठाकरे यांनी आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना केली.
उद्धव ठाकरे यांच्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसोबतच्या चार दिवसीय मराठवाडा दौर्याचा शनिवारी शेवट झाला. मुंबईला परतण्याआधी त्यांनी सायंकाळी चिकलठाणा येथे पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, पक्षातील अनेक लोक गेले याकडे मी वेगळ्या दृष्टीने पाहतो. तुम्हीदेखील नवीन संधी म्हणून याकडे पहा. आपण महानगरपालिका जिंकणारच. मात्र बांधणी नीट करा. झाडाची पानं झडली की नवीन पालवी फुटते. सडलेली पाने गळलेलीच बरी, अशी टीका त्यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांवर केली.
ठाकरे यांनी यावेळी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपचे लोक देशाला लुटून खात आहेत. भाजपाने संभ्रम घोटाळा केला. ते आपणच खरे हिंदुत्ववादी असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. पहलगाम येथे सैन्य लढत होते, यांनी त्यांना थांबवल, अमित शहा यांच्या मुलाच्या हट्टापायी पाकिस्तानसोबत सामना खेळला. उद्या दाऊद आला तरी त्याच्यावर गोमूत्र शिंपडून हे त्याला पवित्र करतील. भाजपचे हिंदुत्व वेगडी आहे, त्यांच्या ढोंगाला बळी पडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
-पालकमंत्री, खासदार भ्रष्टाचाराने बरबटलेले दानवे
अंबादास दानवे यांनी यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली. येथले पालकमंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांची एकेक प्रकरणे बाहेर येत आहेत. खासदार भुमरे यांनीही ड्रायव्हरच्या नावाने जमिनी घेतल्या. परंतु या गद्दारांमुळे काही फरक पडणार नाही. येथे पुन्हा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकणार आहे, असे दानवे म्हणाले.