छत्रपती संभाजीनगर : स्कॉर्पिओच्या धडकेत दोन तरुण ठार  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर : स्कॉर्पिओच्या धडकेत दोन तरुण ठार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भरधाव स्कॉर्पिओने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील एक तरुण हवेत उडाला आणि उड्डाणपुलावरून थेट ३० फूट खाली रस्त्यावर कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुण ठार झाले. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावर ६ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता हा अपघात झाला. या प्रकरणी स्कॉर्पिओचालक आणि पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत फिलीप पाखरे (रा. पीडब्ल्यूडी शासकीय निवासस्थान, पदमपुरा) आणि राहुल लखपतसिंग लोदी (रा. केशरसिंगपुरा, कोकणवाडी) अशी मृतांची नावे आहेत. ते दो घेही चांगले मित्र होते.

अधिक माहितीनुसार, महानुभाव चौकाकडून रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर जीव्हीपीआर कंपनीकडून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता तसेच दिशादर्शक फलक न लावता त्या बाजूचा रस्ता बंद करून वाहतूक राँग साईडने वळविली होती. त्या रस्त्यावरून स्कॉर्पिओ (एमएच ०६, एएन ८०७६) रेल्वेस्टेशनकडे जात होती. त्याचवेळी दुचाकीस्वार (क्र. एमएच २०, एफके ०४८२) हेमंत आणि राहुल हे दोघे मित्र महानुभाव चौकाकडे येत होते. राँग साईड जाणाऱ्या स्कॉर्पिओने उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीवरील राहुल लोदी हा हवेत उंच फेकला गेला.

जीव्हीपीआर कंपनीही आरोपी

मनपाच्या पाणीपुरवठा लाईनचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीला रस्ता बंद करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच वाहतूक वळविली असल्यास सुरक्षिततेच्या उपाययोजना (बोधचिन्ह, रिफ्लेक्टर) करणेही तेवढेच गरजेचे आहे. मात्र जीव्हीपीआरने तसे न केल्यामुळे आणि विनापरवानगी वाहतूक राँग साईडने वळविल्यामुळे या प्रकरणी ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीलाही आरोपी करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT