न्यू श्रेयनगरमधून एकाच रात्री दोन हॅरियर गाड्या लंपास file photo
छत्रपती संभाजीनगर

Cars theft : न्यू श्रेयनगरमधून एकाच रात्री दोन हॅरियर गाड्या लंपास

उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात महागड्या चारचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीने आता आपला मोर्चा हॅरियर वाहनांकडे वळवल्याचे दिसून येत आहे. न्यू श्रेयनगर आणि दशमेशनगर परिसरातून चोरट्यांनी मंगळवारी (दि.१७) एकाच रात्री दोन हॅरियर गाड्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी सिंधी कॉलनी परिसरातून अशाच प्रकारे दोन क्रेटा गाड्या चोरीला गेल्या होत्या.

न्यू श्रेयनगर येथील रहिवासी आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर राधेश्याम तिवारी यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी हॅरियर (जीजे- २१-सीडी- ५६७८) नेहेमीप्रमाणे नगरसेवक रेणुकादास वैद्य यांच्या घरासमोर पार्क केली होती. बुधवारी (दि.१८) सकाळी ८:३० च्या सुमारास गाडीच्या काचा फुटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेल्या दिसल्या आणि गाडी गायब असल्याचे वैद्य यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिवारी यांच्या पत्नीला माहिती दिली. त्यानंतर वैद्य यांनी पोलिस आयुक्तांसह उस्मानपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दरम्यान, तिवारी यांची गाडी चोरीला गेली असतानाच त्यांच्या घराशेजारील दशमेशनगर भागातील विवेकानंद दत्तात्रय भोसले यांचीही हॅरियर (एमएच-२०-जीक्यू-९९२८) चोरट्यांनी त्याच रात्री लंपास केली. भोसले यांनी आपली गाडी दशमेशनगर येथील आपुलकी अपार्टमेंटशेजारी रोडवर पार्क केली होती. या दोन्ही गाड्यांची एकूण किंमत ३३ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायटेक चोरीची पद्धत

चोरटे वाहनांच्या सेन्सरमध्ये छेडछाड करून किंवा गाडीची काच फोडून अलार्म सिस्टिम निकामी करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सिंधी कॉलनीतील क्रेटा चोरीच्या घटनेनंतर आता हॅरियर चोरीची ही मोठी घटना घडल्याने ही एकच आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT