Two school students drown in lake
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. ३० रोजी दुपारी तालुक्यातील सोनखेडा येथे घडली. आकाश रमेश गोरे (१६), अनिकेत रमेश बनकर (१७) दोघेही (रा. घोडेगाव, ता. खुलताबाद) असे मृत मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश व अनिकेत यांच्यासह अजून एक मुलगा दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान जनावरे चारण्यासाठी डोंगराच्या कडेला घेऊन गेले होते. सोनखेडा गावालगत असलेल्या बक्षीबा डोंगराच्या पायथ्याशी एक छोटा तलाव आहे. त्या तलवात पाण्याकडे बघून आकाश व अनिकेतला पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी पाण्यात पोहोण्याचा निर्णय घेतला.
सोबत असलेल्या त्यांचा एक मित्र लहान असल्याने त्याने पाण्यात उतरण्याचे टाळले व तो कडेला उभा राहिला. पाण्यात उड्या घेतलेल्या दोन्ही मित्र पाण्यात डुबत आहे असे दिसताच. त्याने आरडा-ओरड केली असता स्थानिक नागरिकांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढले प्रथमतः आकाश याला गदाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर अनिकेत याला खुलातबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
खुलताबाद पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आसहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल आनंद अडसोळे हे करत आहे.
अनिकेत बनकर आणि आकाश गोरे दोन्ही शाळकरी मुलांना पोहता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, गुरे चारण्यासाठी गेल्यानंतर तलावातील पाणी पाहून दोघांनाही पोहण्याचा मोह आवारला नाही. त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. सुदैवाने तिसरा अल्पवयीन मित्र तलावाबाहेर थांबल्याने त्याचा जीव वाचला.
अनिकेत रमेश बनकर हा छत्रपती संभाजीनगर येथील एका शाळेत शिक्षण घेत होता तो दोन दिवस सुट्ट्या असल्याने घोडेगाव येथील मामाच्या गावी आला होता.