Two murders and incidents of vandalism arson Vaijapur taluka last eight days
नितीन थोरात
वैजापूर : तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये घडलेल्या दोन खुनांच्या व जाळपोळीसह तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करत तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास पोलिसांकडून नागरिकांना देण्यात आला आहे. तसेच तात्काळ परिस्थिती हाताळल्याने पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पहिल्या घटनेत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत तिचा गळा चिरून हत्या केली होती.
दुसरी खुनाची घटना खंडाळ्यात १२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. या घटनेची खबरबात गावात पसरताच संतप्त जमावाकडून, गावात तोडफोड व जाळपोळ सुरू झाली.
उपजिल्हा रुग्णालयात देखील नातेवाईकांचा आक्रोश सुरू झाला तर काही प्रमाणात तोडफोड झाली. शहरासह खंडाळा गावात भीषण राडा सुरू होण्याची शक्यता होती. त्यात अवघ्या १२ मिनिटात पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजीत तयतवाले हे पोलिसांच्या तब्बल ३ गाड्या, खासगी दोन कार आणि जवळपास ४ मोटारसायकल घेऊन तिथे पोहचले. घटनेचे गांभीर्य मोठे होते. असे असतानाच जमावात जाऊन जमावाला शांत करणे ही बाब पोलिसांच्या जिवावर बेतणारी होती,
अशाही परिस्थिती या घटनेला, वैजापूर पोलिस दलाने मोठ्या हिमतीने तोंड दिले. हा राडा अवघ्या एका तासात नियंत्रणात आणला आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गावात जाळपोळ व तोडफोड सुरू होती तर दुसरीकडे तणाव वाढत होता, असे असताना शहरासह ग्रामीण भागात या घटनेचे लोन सर्वत्र पसरू दिले नाही, हे पोलिसांचे सर्वांत मोठे यश आहे. याच कामगिरीचे आता तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. पोलिस अधीक्षक तळ ठोकून...
घटना घडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनय राठोड हे दोन तासांत वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांची सर्व टीम काम करताना तेसुद्धा या घटनेकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. दुसऱ्या दिवशीही घटनेत मृत झालेल्या तरुणाचा २४ तासांनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास जेव्हा परिवार नकार देत होता, त्याच दिवशी त्यांची समजूत काढण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
दोन खुनांतील एकूण आठ आरोपींना २४ तासांत अटक करत स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी उल्-लेखनीय कामगिरी केली. तोडफोड व जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून, कुणी न घाबरता पोलिस ठाण्यात घटनेबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी नागरिकांना केले आहे.