Mangalsutras Snatched : २४ तासांत पुन्हा दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mangalsutras Snatched : २४ तासांत पुन्हा दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडले

वॉक करणाऱ्या महिला टार्गेट; मुकुंदवाडी, उल्कानगरीतील घटना

पुढारी वृत्तसेवा

Two more women's Mangalsutras snatched within 24 hours

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन वृद्ध महिलांना लक्ष करून दुचाकीवर आलेल्या चोरांनी सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मुकुंदवाडी आणि उल्कानगरी हिरण्यनगर परिसरात झालेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही प्रकरणांत मुकुंदवाडी आणि जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

मुकुंदवाडीत मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर झडप

पहिली घटना बुधवारी (दि. २५) सकाळी ६ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भागात घडली. गंगूबाई अशोक काळे (५५) या एन-२ ग्राऊंडवर मॉर्निंग वॉक करून घरी परतत होत्या. न्यू एसटी कॉलनीजवळील रोडवर काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील १९ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या झटापटीत महिलेच्या मानेला झटका बसून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिरण्यनगरमध्ये संध्याकाळी फिरताना लूट

दुसरी घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घटना क्र. २ हिरण्यनगर, उल्कानगरी भागात घडली. अलका वसंतराव माळी (६०) या त्यांच्या मैत्रिणीसोबत फिरत असताना बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँकेजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण तोडून पोबारा केला. अवघ्या १० मिनिटांच्या अवधीत चोरट्यांनी ही हातसफाई केली. यातील आजीचे नुकतेच ऑपरेशन झाले होते. त्यांना डॉक्टरांनी चालण्याचा सल्ला दिला होता. मात्र चोरट्यांनी साखळी हिसकावल्याने त्या खाली पडल्याने त्यांना पुन्हा दुखापत झाली आहे.

पोलिसांची गस्त नेमकी कुठे ?

शहरात सातत्याने मंगळसूत्र चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिसांची गस्त नेमकी कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्यंतरी गुन्हे शाखेसह सर्व ठाणेदारांना वरिष्ठानी सकाळ, संध्याकाळ प्रभावी गस्त घालून संशयितांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नाकाबंदीही करण्याच्या सूचना होत्या. मात्र या आदेशाला कोणी गांभीर्याने घेत नसल्याने चोरटे निर्धास्तपणे महिलांना लक्ष करत आहेत. पोलिसांची गस्त नसल्याने चोरांना मोकळे रान मिळाले आहे, विशेषतः मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ महिला आता घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT