Two individuals who murdered 'that' youth remanded to 5-day police custody
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको पोलिस ठाण्यापासून १०० फूट अंतरावर शनिवारी (दि.३०) मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. एन-६, संभाजी कॉलनी) याची निघृण हत्या करण्यात आली होती. खुनी टोळीतील दोन मुख्य म्होरक्यांना सिडको पोलिसांनी जेरबंद केले आहे. मुख्य आरोपी प्रसेनजित हिवाळे याच्यासह त्याचा साथीदार अरुण भूल (१९) या दोघांना सोमवारी (१ जून) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ जूनपर्यंत ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० फूट अंतरावर घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. घटनेच्या वेळी ५ ते ७ माथेफिरू गुंडांच्या टोळक्याने प्रवीणला घेरून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी अमानुष हल्ला चढवला होता, अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना तत्परतेने गजाआड केले मृत प्रवीणच्या हत्येमागचा मुख्य सुत्रधार कोण? या वादाचे गूढ आता पोलिस कोठडीदरम्यान उकलणार आहे. तपास सपोनी योगेश गायकवाड करत आहेत.
फरार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
पसार झालेल्या उर्वरित ५ ते ६ आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरात तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. आरोपींच्या संभाव्य अड्यांवर आणि शहराबाहेर छापे मारण्यासाठी सिडको पोलिस ठाण्याचे एक आणि गुन्हे शाखेचे एक अशी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.