Two hours of torrential rain flooded the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात गुरुवारी (दि. २८) दुपारी मुसाळधार पाऊस झाला. सुमारे दोन तास बरसलेल्या तुबंळ पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सखल भागांत मोठी तळी निर्माण झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. तर अचानक झालेल्या जोरदार पावसाने व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.
काही भागांतील झाडे उमळून पडली. दोन तासांत शहरात ४० मिमी पाऊस पडला असून, पडेगावात ४५ मिमी पावसाची नोंद एमजीएम वेधशाळेत झाली आहे. शहरातील कमाल व किमान तापमानात घट झाल्याची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे.
शहर व परिसरात गुरुवारी दुपारी दोन तास मुसळधार पावसाने धडक दिली. अचानक को-सळलेल्या या पावसामुळे अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही ठिकाणी तर सखल भागांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सलग दोन तास अविरत कोसळत राहिला. त्यानंतर शहरातील मुख्य रस्ते, गल्ल्या जलमय झाल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी चारचाकी, दुचाकी वाहनांना पाण्यातून मार्ग काढताना अक्षरशः पोहावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यात पादचाऱ्यांनाही हाल सोसावे लागले. तसेच दुकानांसह घरांसमोर पाणी साचल्याने व्यापाऱ्यांनाही अडचणी निर्माण झाल्या. पावसाच्या पाण्याचे लोंढे रस्त्यांवरून ओसंडून वाहत होते. विशेषतः सखल भागातील तळघरांमध्ये काहीप्रमाणात पावसाचे पाणी शिरले. तसेच खडकेश्वर मनपा वाचनालयासमोर व श्रेयनगर भागातील शुभम सोसायटीत झाड उमळून पडले. तर दशमेशनगर येथील महादेव मंदिराजवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते.
बन्सीलालनगर येथील म्हाडा कॉलनीत झाड उमळून पडल्याने ते हटवण्याचे काम मनपाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अचानक आलेल्या या पावसामुळे काही भागांत वीज पुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने आज शुक्रवारीही पावसाचा अंदाज वर्तवला असून, जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात गुरुवारी दुपारी सुमारे दोन तासांत ४० मिमी पाऊस पडल्याची नोंद एमजीएम वेधशाळेत नोंदवली गेली असून, कमाल २८.४ अंश सेल्सिअस, तर किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली आहे.
शहरासह परिसरात गुरुवारी दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाला. पडेगाव येथे दोन तासांत ४५ मिमी पाऊस झाल्याची नोंद पडेगाव एमजीएम वेधशाळेत झाली आहे.
सातारा परिसरातील मुख्य गावठाण, उनणपूल, बीड बायपासवरील उड्ड-ाणपुलाखालील, एमआयटी परिसर कैलासनगर, मोंढा, मारुती मंदिर परिसरातील सखल भाग, औषधी भवन, गोमटेश मार्केट, औरंगपुरा भाजीबाजार परिसर, घाटी, बायजीपुरा, दिवाणदेवडी यासह पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम जिथे जिथे सुरू आहे, तिथे पैठण रोड, गोलवाडी, इटखेडा, कांचनवाडी या रस्त्यावरील पादचारी परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले.