District Bank Robbery Case : जिल्हा बँकेचे २५ लाख लुटणाऱ्या टोळीत ग्रा. पं. सदस्यांची दोन मुले File Photo
छत्रपती संभाजीनगर

District Bank Robbery Case : जिल्हा बँकेचे २५ लाख लुटणाऱ्या टोळीत ग्रा. पं. सदस्यांची दोन मुले

कर्जबाजारी झाल्याने टाकला दरोडा, स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Two children of Gram Panchayat members in gang that looted Rs 25 lakhs from district bank

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारी झालेल्या नानेगाव ग्रामपंचायत सदस्याच्या मुलानेच अन्य तिघांच्या मदतीने शनिवारी (दि. १५) सकाळी अकराच्या सुमारास पाचोड-पैठण रोडवर दावरवाडी शिवारात जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्याकडील २५ लाखांची रोकड लुटल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासोंत टोळीचा पर्दाफाश करून चौघांना बेड्या ठोकल्या.

भारत राजेंद्र रूपेकर (३०), विष्णू कल्याण बोधने (२४, दोघे रा. नानेगाव, ता. पैठण), सचिन विठ्ठल सोलाट (२५, रा. राहुलनगर, उत्तर जायकवाडी) आणि विशाल दामोधर चांदणे (२४, रा. अखातखेडा, ता. पैठण) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी रविवारी (दि. १६) पत्रकार परिषदेत दिली. आर-ोपींकडून रोख २५ लाख रुपये, स्विफ्ट कार, ८ मोबाईल असा ३१ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारत रूपेकर आणि विष्णू बोधने या दोघांची आई नानेगावची ग्रामपंचायत सदस्य आहे. मात्र दोघेच कारभार पाहायचे.

फिर्यादी गणेश आनंदा पहिलवान (५९, रा. पैठण) हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दावरवाडी शाखेत अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते मार्केट यार्ड, पैठण येथील शाखेतून दावरवाडी शाखेकडे नियमितपणे रोख रक्कम वाहतूक करतात. शनिवारी (दि. १६) सकाळी ११.४० वाजता स्कूटीवरून २५ लाखांची रोख रक्कम गोणीत घेऊन दावरवाडीच्या दिशेने जात असताना काळ्या दुचाकीवरील दोघांनी स्कूटी अडवून रोकड लुटली.

या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. दोन पथकांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे चारही आरोपींचा माग काढत पैठण शहरात स्विफ्ट कारमधून (एमएच-२०-एफयू-३४७९) पळण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय संतोष मिसळे, पवन इंगळे, विठ्ठल डोके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली. पुढील तपास सपोनि सचिन पंडित करत आहेत.

कर्ज फेडण्यासाठी लुटीचा कट

रूपेकर कर्जबाजारी झालेला आहे. त्याच्यावर ट्रॅक्टरचे पाच लाखांचे कर्ज होते. ते फेडण्यासाठी कट रचला. फिर्यादी पहिलवान हे नेहमी बँकेची रोकड एका शाखेतून दुसरीकडे घेऊन जात असल्याचे पाहिले. हे पैसे लुटणे शक्य असल्याने त्याने अन्य तिघांना सोबत घेत कट रचला. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने मी कर्जफेड केल्याने माझ्याकडे पैसेच नाहीत, असा कांगावा केला. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच चौघांनी पैसे काढून दिले.

लुटारूंनीच विचारले, मामा बैंक लुटली की काय?

बँकेच्या आत रूपेकर गेला होता. तो फिर्यादीच्या जवळच घुटमळत होता. फिर्यादी पैशाची गोणी घेऊन बाहेर आले तेव्हा कारमध्ये बसलेल्या अन्य आरोपींनी त्यांना मामा एवढे पैसे घेऊन जाताय? बैंक लुटली की काय? अशी विचारणा करून गंमत केली. थोड्या अंतरावर पाठलाग करत थेट २५ लाख लुटले. रूपेकर १० लाख तर अन्य आरोपी प्रत्येकी ५ लाख अशी वाटणी ठरली होती.

जिल्हा बँकेचा हलगर्जीपणा

सेवानिवृत्त पहिलवान यांच्याकडे दररोज पैठण येथून दावरवाडी शाखेत मोठ्याप्रमाणात रोख रक्कम नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पहिलवान हे रोकड गोणीत भरून स्कूटीवर पायाजवळ ठेवून घेऊन जायचे. रोख रक्कम नेण्यासाठी सुरक्षेची कोणतीही काळजी बँकेने घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT