Two arrested for selling narcotics
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील तरुणाईला नशाखोरीच्या जाळ्यात ओढणाऱ्या अंमली औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून १६५ गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.२४) जालना रोडकडून महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ करण्यात आली.
अजय भाऊसाहेब गात (२७, रा. गल्ली नं. ३०, बायजीपुरा) आणि श्रीकांत रामेश्वर शेजुळ (२०, रा. हनुमान मंदिराजवळ, गल्ली नं. ३०, बायजीपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पडेगाव येथील नयना शेख उर्फ बाजी हिच्याकडून गोळ्या आणल्याची माहिती दिल्याने तिलाही आरोपी करण्यात आले आहे.
एनडीपीएस पथकाला दोन तरुण जालना रोडकडून महेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाफना ज्वेलर्सच्या मोकळ्या प्लॉटजवळ नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने धाव घेऊन दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता १६५ नशेच्या गोळ्या, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून दोघांनाही ताब्यात घेतले.
अजय गात हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरात मारहाण, दमदाटीसह विविध पोलिस ठाण्यांत ७ते ८ गुन्हे आधीच नोंद आहेत. जास्त नफा कमावण्यासाठी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने नशेच्या गोळ्यांची तस्करी सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, अंमलदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतीश जाधव, छाया लांडगे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, विठ्ठल पवार यांनी केली.